औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात हाताला रोजगार नाही मग पोट कसं भरणार ? हा प्रश्न मजुरांसमोर उभा ठाकलायं. अशावेळी गावी जाण्याचाच पर्याय समोर असून मजुरांनी गावी जाण्याची वाट देखील धरली. दरम्यान विश्रांतीसाठी रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर मालगाडीखाली चिरडले गेल्याची बातमी समोर आली. देशभरातून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी या घटनेप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. मजुरांची योग्य ती काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. पायी प्रवास करण्याची वेळ मजुरांवर का आली ? , त्यांनी रेल्वे रुळ मार्गाचा पर्याय का निवडला ? मजूर रेल्वे रुळावर का झोपले होते ? असे अनेक प्रश्न उभे राहत आहेत.


खाण्यापीण्याच्या प्रश्नापासून मजुरांसमोर अनेक समस्या आहेत. दरम्यान यातील एका मजुराने आपली दु:ख व्यथा व्यक्त केली आहे. आम्ही रस्त्यावर चाललो तर पोलीस आम्हाला मारतात. म्हणून रेल्वे रुळाचा मार्ग आम्हाला योग्य वाटला असे एका मजुराने झी चोवीस तासला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 



चुकीच्या रस्त्याने जात असल्याचे पोलीस आम्हाल म्हणतात. पण आमच्यासाठी खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही. स्पेशल ट्रेन पाठवणार असे सरकार म्हणतेय पण तशी व्यवस्था काही दिसून येत नाही. अशावेळी आम्ही पायी जाऊ नाहीतर काय करु ? असा प्रश्न मजूर उपस्थित करत आहेत.


दरम्यान ही दुर्घटना झाल्यानंतरही रेल्वे रुळामार्गे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही. खाण्यासाठी लोकं जे काही देतात त्यातून आम्ही कसातरी दिवस काढतो.


औरंगाबाद-जालना मार्गावर करमाडजवळ पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. औरंगाबाद-जालनादरम्यान हे सर्व मजूर रुळांवर झोपले होते. जालनाहून भुसावळकडे पायी जाणारे मजूर, मध्यप्रदेशला निघाले होते. हे मजूर रेल्वे रुळांच्या बाजूने चालत होते. मात्र थकवा आल्याने मध्येच आरामासाठी ते रुळांवरच झोपले असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.