औरंगाबाद : जिल्ह्यात पाणीटंचाईचा पहिला बळी गेलाय. फुलंब्री तालुक्यातील निमखेडा गावात पाणी  भरण्यासाठी  गेलेल्या एक २५ वर्षीय महिलेचा पाण्याचा टँकरखाली दबून मृत्यू झालाय. सुनीता हटकर, आपल्या लेकरांसाठी, कुटुंबियासाठी पाणी भरायला गेलेली ही माता आता पुन्हा कधीच कोणाला दिसणार नाही, पाणी भरत असताना टँकरखाली चिरडून तिचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर सुनीताबाईंची दोन लहान मुले पोरकी झाली आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील निमखेडा तालुक्यातील ही ह्रदयद्रावक घटना आहे. जोशीववस्तीवरील विहीरीच पाणी खोल गेलयं. पाणी भरण्यासाठी टॅंकर आला होता. यावेळी पाणी भरण्यासाठी तुडूंब गर्दी झाली. मात्र विहिरीजवळच्या मातीत टँकरचं चाक रुतलं आणि तिथली जमीन खचल्याने टॅंकर उलटला. तिथंचं उभ्या असलेल्या सुनीता  टँकरखाली आल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. जमलेल्या महिलांनी सुनीताला टँकरखालून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र सुनीता वाचू शकली नाही.


याप्रकरणावर अधिकारी उडवाउडवीची उत्तर देताहेत. ग्रामपंचायतीने टँकरचा प्रस्ताव दिला नसल्याने गावाला शासकीय टॅंकर नसल्याचं सांगत अधिकारी वेळ मारून नेतायत. त्यामुळे खासगी टँकरला बोलवल होतं. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा हा मतदारसंघ आहे, पीडीत कुटुबियांना शासकिय मदत देण्याचा प्रयत्न करु असं त्यांनी सांगितले. 


घरची परिस्थिती अत्यंत बेताची असलेल्या सुनीताबाईंची दोन लहान मुले आता पोरकी झाली आहेत. पाणी आणायला गेलेली त्यांची आई परतणार नाही. दुष्काळाची दाहकता जाणवू देणारीही घटना नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच घडलीय, त्यामुळे पुढील उन्हाळ्यच्या दिवसांत काय परिस्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.