Badlapur School Sexual Assault Case: मुंबईच्या उपनगरांपैकी महत्त्वाचं शहर असलेल्या बदलापूरमध्ये आज हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला त्या शाळेपुढे आज हजारो आंदोलकांनी एकत्र येत आंदोलन केलं. या आंदोलनाला बदलापूर रिक्षाचालक संघटनेनं पाठिंबा देत आज शहरातील रिक्षा सेवा बंद ठेवली आहे. सकाळी 10 च्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांनी रेल्वे मार्गावर उतरत वाहतूक आडवून धरली. पीडित मुलींना तातडीने न्याय मिळावा अशी मागणी करत रेलरोको करण्यात आला. बदलापूर स्थानकामधील गर्दीचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या आंदोलनामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. मात्र एवढ्या मोठ्याप्रमाणात जनक्षोभ उसळणारं हे प्रकरण नेमकं आहे काय हे जाणून घेऊयात...


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलापूर शहरातील पूर्वेत असलेल्या आदर्श शाळा नावाच्या नामांकीत शाळेतील प्रकरणामुळे आज हजारो बदलापूरकर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. या शाळेत शिकणाऱ्या 3 वर्षांच्या 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने पालकांमध्ये संतापाची लाट आहे. पीडित मुलींच्या पालकांना आपल्या पाल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं लक्षात आल्यानंतर शाळेकडे यासंदर्भात तक्रार केली. तसेच पोलीस स्टेशनमध्येही या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला असताना पोलिसांकडून तक्रार दाखल करुन घेण्यास दिरंगाई झाल्याने पालकांचा संताप अनावर झाला आणि या प्रकरणाला आंदोलनाचं स्वरुप मिळालं.


पालकांच्या मनात भिती


पोलिसांनी आदर्श शाळेत घेतलेल्या या अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास अधिक वेळ घेतल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालं. याप्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. मात्र या प्रकारानंतर विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या मनातही आपल्या पाल्याच्या सुरक्षेसंदर्भात भितीचं वातावरण असून शाळा अधिक सुरक्षित असाव्यात आणि घडलेल्या प्रकरणात तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहेत. 



कसा उघडकीस आला हा प्रकार?


सदर शाळेमध्ये छोट्या शिशुच्या वर्गात शिकणाऱ्या 3 वर्षाच्या एका मुलीने शाळेत मदतनीस असलेल्या 'दादा' नावाच्या व्यक्तीने माझ्या गुप्तांगाला हात लावल्याचं पालकांना सांगितलं. मुलीने सांगितलेला प्रकार समजल्यानंतर तिच्या पालकांनी तिच्याच वर्गात शिकणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या पालकांना मुलीने सांगितलेला प्रकार कळवला. हा सारा प्रकार ऐकून दुसऱ्या मुलीच्या पालकांना शंका आल्याने त्यांनी आपल्या मुलीकडे याबद्दल चौकशी करण्याचं ठरवलं. मात्र त्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीची बदलापूरमधील एका रुग्णालयामध्ये तपासणी केली. वैद्यकीय तपासणीमध्ये या मुलीबरोबर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं. 


पोलीस आणि शाळेवर गंभीर आरोप


वैद्यकीय रिपोर्टमध्येच लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांबरोबरच पीडितेच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. मात्र इथेही पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास दिरंगाईचा आरोप पालकांनी केला. तसेच शाळेची बदमानी होईल असा विचार करुन संचालक मंडळानी कारवाई करण्याच दिरंगाई केल्याचा पालकांचा आरोप आहे.



गुन्हेगाराला अटक; वय 24 वर्ष


बऱ्याच वादावादीनंतर 16 ऑगस्ट रोजी रात्री 10 च्या सुमारस पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करुन घेतला. बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करुन आरोपीसा अटक केली. अटक केलेला आरोपी 24 वर्षांचा असून तो या शाळेतील सफाई कर्मचारी असल्याचेही अंबरनाथचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वरडे यांनी सांगितले आहे.


शाळेकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?


या प्रकरणामध्ये लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीबरोबरच सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न यंत्रणांनी केल्याचा आंदोलक पालकांचा आरोप आहे. या प्रकरणावरून स्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. अनेक दिवसांनंतरही शाळा प्रशासनाने निवेदन दिलं नाही म्हणून स्थानिकांचाही संताप उसळला. संचालक मंडळातील काही अधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप केला जात आहे. हे सारं प्रकरण हाताबाहेर चालल्याचं समोर आल्यानंतर शाळेने माफीनामा जाहीर केला आहे. तसेच शाळेच्या संचालक मंडळाने याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित केलं आहे. तसेच शाळेमध्ये मुलींची देभाल करण्यासाठी नियुक्त केलेल्या 2 सेविकांनाही कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. मात्र ज्या पद्धतीने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला ते पाहता शाळेचं संचालक मंडळाबरोबरच पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.