आई-बाबा ट्रेनमध्ये चढले तरी चिमुरडा प्लॅटफॉर्मवरच; ट्रेन सुरु झाली आणि पुढे...पाहा व्हिडीओ
Police Save child life: बडनेरा रेल्वे स्टेशनवरुन एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे धावत्या रेल्वेत चढणाऱ्या लहान मुलाचा जीव वाचला आहे.
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: कमी वेळात जास्त अंतर कापते आणि आरामदायी प्रवासामुळे रेल्वे नागरिकांच्या फायद्याची ठरते. पण रेल्वेत चढताना अनेकजण अजिबात मागचा पुढचा विचार करत नाही. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. सुदैवाने अशीच एक घटना घडता घडता राहिली आहे. बडनेरा रेल्वे स्टेशनवरुन एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
पोलिसाच्या सतर्कतेमुळे धावत्या रेल्वेत चढणाऱ्या लहान मुलाचा जीव वाचला आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा रेल्वे स्टेशनवर एक कुटुंब आले. नवऱ्याच्या दोन्ही हातात बॅग होत्या. तर पुढे चालणाऱ्या बायकोच्या हातात छोटे बाळ होते. त्यांच्या साधारण 4 ते 5 वर्षांचा मुलगा वडिलांच्या मागून चालत होता. नवऱ्याने बायकोला ट्रेनमध्ये चढवले. पण तितक्यात ट्रेन सुरु झाली. त्यानंतर हा थरार घडला.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, अमरावती बडनेरा रेल्वे स्टेशनवर हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस येऊन थांबली होती. त्यानंतर एक परिवार आपल्या मुलासह चालू रेल्वे पकडत होता. त्यात लहान मुलगा हा खाली राहिला होता. दरम्यान या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी गौतम शिरसाठ आणि सुनील कडू यांनी धावत्या रेल्वेमध्ये मुलाच्या वडिलांना चढू दिले. त्यानंतर मुलाला काखेत घेऊन धावत जाऊन गाडीमध्ये जीवाची पर्वा न करता बसवून दिले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.