सप्तश्रृंगी गडावर आता `बोकड बळी` नाही
श्रद्धा म्हणून पाहणाऱ्या भाविकांसाठी हा धक्कादायक निर्णय असल्याचे बोलले जात आहे.
कळवण : सप्तश्रृंगी गडावर यंदापासून बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत होत असले तरी श्रद्धा म्हणून पाहणाऱ्या भाविकांसाठी हा धक्कादायक निर्णय असल्याचे बोलले जात आहे.
सप्तश्रृंगी गडावर गेल्यावर्षी दसऱ्याला बोकडबळी देतांना मानवंदनेप्रसंगी (हवेत गोळीबार) १२ जण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते. स्थानिक पातळीवर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत असले तरी जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत काय घडते याकडे आता लक्ष लागून आहे. संप्तश्रृंगी गड मंदिर परिसरात बोकडबळीवर बंदी कायम राहणार आहे.
उत्सवाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीने बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. दरम्यान भाविकांमार्फत वैयक्तिकरित्या होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी नसणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.