आपण चित्रपटात अनेक वेळा बँक दरोडे, बँक चोरी आणि बँक फोडीचे प्रकार बघितले आहेत. आपण उत्साहाने पुढे काय घडेल याचा विचार करत संपूर्ण मालिका किंवा चित्रपट पाहतो. काही कथानकांमध्ये चोर किंवा दरोडेखोर बँकेत जाऊन लूटमार करतात तरी कधी चोरीचा डाव फसतो. अगदी बॉलिवूडमधील आँखे चित्रपटापासून ते स्पॅनिश वेब सिरीज असलेल्या 'मनी हाइस्ट'पर्यंत अनेक सिरीजमध्ये असा ट्विस्ट पाहिला असेल. पण एखाद्या चित्रपटाला साजेशी कथा महाराष्ट्रातील एका बँक शाखेची आहे असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. महाराष्ट्रात एक अशी बँकेची शाखा आहे जिथे सरासरी दर 2 वर्षांनी बँक फोडली जाते. मागील 14 वर्षात या बँकेची शाखा 7 वेळा फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. ही बँक नेमकी आहे तरी कुठे आणि नक्की घडतंय काय पाहूयात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं प्रकार काय घडला?
ज्या बँक शाखेबद्दल आपण बोलतोय ती चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या टेमुर्डा गावात आहे.  टेमुर्डा गावातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चोरांकडून फोडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 15 वर्षात ही शाखा तब्बल 7 वेळा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातील काही प्रयत्न यशस्वी झाले तर काही अपयशी सुद्धा ठरले. या बँकेची शाखा नागपूर-चंद्रपूर महामार्गाच्या अगदी शेजारी आहे. त्यामुळेच चोरांसाठी चोरी करुन इथून पळ काढणं सोपं असल्याने ही बँक चोरांसाठी 'सॉफ्ट टार्गेट' ठरते. ही घटना शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री 12 ते 12:30 च्या दरम्यान घडली आहे. बँकेला लागून असलेल्या ग्रामपंचायतची खिडकी तोडून चोरांनी बँकेत शिरण्याचा प्रयत्न केल्याचं घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर स्पष्ट झालं आहे. 


घटनेचा शोध कसा लागला :
या बँकेच्या शाखेच्या शेजारी रहात असलेल्या रमेश ठवरी यांच्या घरातील कुत्रा चोरांच्या आवाजामुळे भुंकायला लागला. कुत्रा भुंकायला लागल्यामुळे कुटुंबीयांना वेगळाच संक्षय आला आणि त्यांनी पोलिसांना कॉल  केला. रमेश ठवरी यांनी पोलिसांबरोबरच गावातील त्यांचे सहकारी, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत कर्मचा-यांना ही माहिती दिली. पोलीसांना माहिती मिळताच पोलिसांची एक गाडी बँकेकडे रवाना झाली. सर्वांनी बँकेकडे धाव घेताच चोरांनी दरोडा अर्ध्यात सोडून तिथून धूम ठोकली. चोरांनी आपली ओळख पटू नये म्हणून बँकेतील सीसीटीव्ही आणि डीव्हीआर पळवून नेला. डीव्हीआर म्हणजे सीसीटीव्हीचं रेकॉर्डींग ज्या ठिकाणी रेकॉर्ड केलं जातं तशी कॅसेट सदृश्य वस्तू. पोलिसांकडून चोरांचा शोध सुरु आहे. पुन्हा एकदा बँक फोडण्याचा प्रयत्न झाल्याने आज सकाळपासून तालुक्यामध्ये पुन्हा एकदा दरोडे पडण्यासाठी (कु)प्रसिद्ध असलेल्या या बँक शाखेचीच चर्चा आहे.