रत्नागिरीत बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा वाद पेटला, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Barsu Refinery Project Protest: बारसू - सोलगाव रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध केला आहे. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस आहे. यासाठी अधिकारी, पोलीस मोठ्या संख्येनं बारसू गावात आले होते .मात्र, रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली.
प्रणव पोळेकर / रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू - सोलगाव रिफायनरीला (Barsu Refinery Project Protest) स्थानिकांचा तीव्र विरोध केला आहे. गोळ्या झाडा, खून करा, आम्ही हटणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस आहे. यासाठी अधिकारी, पोलीस मोठ्या संख्येनं बारसू गावात आले होते .मात्र, रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली. यावेळी आंदोलनकांना पोलिसांनी आवाहन केले. घरी निघून जा म्हणून सांगितले. मात्र, ते न ऐकल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रिफायनरीला तीव्र विरोध; महिलांचा रस्त्यावर ठिय्या, पोलिसांची गाडी रोखली
काहीही झाले तरी आम्ही हा प्रकल्प हद्दपार करणार, अशी आंदोलनकांनी भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही ही ठाम भूमिका ग्रामस्थांची आहे. सर्वेक्षणाला विरोध असून, मेलो तरी जागा सोडणार नाही यावर ग्रामस्था ठाम आहेत. आता गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, माध्यम प्रतिनिधींनाही हटवण्याचे प्रयत्न सुरुआहेत. त्यामुळे सर्वेक्षणाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. आंदोलनकर्त्यांना आता रत्नागिरीकडे नेण्यात येत आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बारसू परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता पोलीस बळाचा वापर करुन सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाने 22 एप्रिल ते 1 मे या कालावधीत बारसू सडा, बारसू, पन्हाळे टारफे राजापूर, धोपेश्वर, गोवळ या ठिकाणी येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
बारसू, सोलगाव गावात कलम 144
रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणापूर्वी बारसू, सोलगाव गावात कलम 144 लागू करण्यात आले आहे. तरीही ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येत होते. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. दरम्यान, या भागातील प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणापूर्वी रत्नागिरी पोलिसांनी राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव या गावांमध्ये कलम 144 लागू केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक रहिवाशांचा या प्रकल्पाला विरोध आहे.
सर्वेक्षण सुरु करण्यासाठी प्रशासन सज्ज असताना रत्नागिरी पोलिसांनी गावागावांत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या आहेत. त्यांनी किमान चार रिफायनरी विरोधी कार्यकर्त्यांनाही अटक केली असून बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या 45 स्थानिक रहिवाशांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या भागात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू करण्यात आल्याचे म्हटले आहे. रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे कार्यकर्ते सत्यजीत चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.