शहा, रेड्डी, शर्मा... बारसूत कोणाची किती जमीन? सुषमा अंधारेंनी वाचून दाखवली जमीन मालकांची यादी
बारसू रिफायनरीचा वाद पेटला असतानाच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी बारसूत कोणाच्या नावे किती जमीन आहे याची यादीच वाचून दाखवली आहे. यात आशिष देशमुखांचंही नाव आहे.
Barsu Refinery : बारसूत सुरू असलेलं आंदोलन 3 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलंय. बारसू आंदोलनातील नेते काशिनाथ गोरोले यांनी ही माहिती दिलीय. आम्ही चर्चेला तयार आहोत. मात्र तोपर्यंत माती परीक्षण थांबवा, आंदोलकांची तत्काळ सुटका करावी अशी मागणीही काशिनाथ गोरोले यांनी आंदोलकांच्या वतीनं केलीय. कोकणातील राजापूर (Rajapur) तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरात क्रूड ऑईल रिफायनींग करण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोलिअम उद्योग (Ratnagiri Refinery And Petrochemicals Limited) ही रिफायनरी (Refinery) प्रस्तावित आहे. या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी सोमवारपासून माती परीक्षण करण्याची सुरुवात झाली आहे. स्थानिक गावकऱ्यांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचं चर्चेचं आवाहन
दरम्यान बारसू आंदोलकांना रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेचं आवाहन केलं, मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनावर बहिष्कार टाकला. पण आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी बारसू आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आले असता आंदोलकांनी चर्चेकडे पाठ फिरवली. दुसरीकडे, बारसूतल्या रिफायनरीसाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती करणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) दिलीय. विरोध करणाऱ्यांशीही चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊ असं आश्वासन शिंदेंनी दिलंय. तसंच आंदोलकांवर लाठीमार केलेला नसल्याचा दावाही त्यांनी केला. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) संमती कशीकाय दिली होती असा सवालही त्यांनी केलाय.
सुषमा अंधारेंचा आरोप
बारसू रिफायनरीचा वाद पेटलेला असतानाच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी (Sushama Andhare) तिथल्या जमीन मालकांची यादीच वाचून दाखवलीय. बारसू रिफायनरी प्रकल्प परिसरातील या जमीन मालकांच्या यादीत काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांचंही नाव आहे. त्यावरूनही सुषमा अंधारेंनी सरकारकडे बोट दाखवलंय. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. सुषमा अंधारे बरं झालं आशिष देशमुख यांची जमीन आहे हे सांगितलं. मविआतल्या एका नेत्याची जमीन तिथे आहे हे त्यांनी पुराव्यानिशी सिध्द केल्याबद्दल सामंत यांनी धन्यवादही मानले
आंदोलन स्थानिकांचं नाही?
दरम्यान बारसू आंदोलन हे स्थानिकांचं आंदोलन नाहीये, असा अजब दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय. सामंतांच्या या दाव्यावर संजय राऊतांनी सडकून टीका केलीय.. गावाबाहेर कामानिमित्त गेलेले चाकरमानी म्हणजे स्थानिक नाहीत का? असा सवाल राऊतांनी विचारलाय.. बारसूतल्या स्थानिक लोकांना विश्वासात घ्यायचं म्हणजे नक्की कसं असा सवाल आज संजय राऊतांनी पवारांना विचारला. बारसूत सरकारने तातडीने सर्वेक्षण आणि भूसंपादन मागे घ्यावं अशी मागणी ठाकरे गटातर्फे संजय राऊत यांनी मांडली. मात्र आता राऊत हे ठाकरेंचे राहिले नाहीत आणि पवारांचेही राहिले नाहीत असा टोला आमदार नितेश राणेंनी मारला.
आदित्य ठाकरेंनीही बारसू आंदोलनावरुन शिंदे सरकारला सुनावलंय. ज्या प्रकल्पांची राज्याला गरज आहे ते प्रकल्प राज्याबाहेर जातायंत, जे प्रकल्प लोकांना नकोत ते लादले जातायत असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केलाय.