गणपती विसर्जनाला नाचणार असाल तर सावधान! डॉल्बीवर नाचाल, तर जीवाला मुकाल?
पश्चिम महाराष्ट्रात डॉल्बीचा नाद खुळा, डॉल्बीचा दणदणाट तुमच्या जीवावर बेतू शकतो
Ganeshotsav 2022 : डीजेवाले (DJ Sound) बाबू पुन्हा डिमांडमध्ये आलेत. कारण गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत नाचायचं तर डॉल्बी (dolby system) तो मंगता है. कोल्हापूरपासून (Kolhapur) सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात डॉल्बीचा नाद खुळा असतो. मिरवणूक म्हटली की दे दणादण डॉल्बी साऊंड आणि त्यावर थिरकरणारी तरुणाई हे सर्रास दिसणारं चित्र. पण हाच डॉल्बीचा दणदणाट तुमच्या जीवावर बेतू शकतो.
डॉल्बीमुळं येऊ शकतो हार्ट अटॅक ?
डॉल्बीच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळं हार्ट अटॅक (Heart Attack) येऊ शकतो. कोल्हापूरच्या महाद्वार रोड परिसरात 15 वर्षांपूर्वी अबुताई गवळी यांचा असाच मृत्यू झाला होता. डॉल्बीमुळं कंपनं निर्माण होऊ अबुताईंना घाम फुटला आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
डॉल्बी साऊंड सिस्टीम असो, डीजे असो नाहीतर लाऊड स्पीकर. नाचता नाचता हार्ट अटॅक येण्याच्या घटना अलिकडच्या काळात वाढल्यात. जम्मूतली ही घटना. माँ पार्वतीच्या भूमिकेत डान्स करणारा योगेश गुप्ता नावाचा तरुण. नाचता नाचता त्याला स्टेजवरच हार्ट अटॅक आला. तो चक्कर येऊन खाली कोसळला. तो कायमचाच.
बरेलीमध्ये मित्राच्या बर्थडे पार्टीत डान्स करणारे प्रभात कुमार पार्टीच्या माहौलमध्ये ते एवढं गुंग झाले होते की, यमदुतानं त्यांच्या गळ्याभोवती फास कधी आवळला, हेच त्यांना कळलं नाही. डीजेच्या तालावर नाचता नाचता ते खाली कोसळले. नेमकं काय घडलंय, हे इतरांना कळेपर्यंत प्रभात कुमार यांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला होता.
तिसरी घटना मैनपुरीमधली. मनोरंजनाच्या कार्यक्रमात हनुमानाचा रोल करणारा तरुण कार्यक्रम ऐन रंगात आला असताना अचानक नाचता नाचता तो जमिनीवर कोसळला. त्याचाही हार्ट अटॅकमुळं बळी गेला.
बदललेल्या लाईफस्टाईलमुळं अलिकडच्या काळात कधी खेळताना तर कधी नाचता नाचता मृत्यू येण्याच्या घटना वाढल्यात. अगदी तरुणांनाही हार्ट अटॅकचा धोका संभवतो. त्यामुळं गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डॉल्बी, डीजेच्यातालावर बेभान होऊन नाचायची तयारी तुम्ही केली असेल तर सावध व्हा. आपल्या हृदयाची आणि जीवाची काळजी घ्या.