योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : आपल्या पाल्याच्या उच्च शिक्षणासाठी जर आपण शिष्यवृत्तीच्या शोधात असाल तर जरा सबुरीने घ्या . कुठली ही वेबसाईट आपल्या पाल्याच्या शिष्यवृत्तीसाठी प्रलोभन देत असेल किंवा कुठलीही व्यक्ती प्रोसेसिंग सी मागत असेल तर एकदा ही बातमी जरूर वाचा . नाशिक शहरात शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्याची बतावणी करून भामट्यांनी एका पालकास तब्बल पावणे तीन लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आलाये . ही रक्कम प्रोसेसिंग फीच्या ने नावाखाली ऑनलाईन लांबविण्यात आली आहे . याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या रविंद्र श्रीकृष्ण पांडे यांना असाच अनुभव आला. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात पांडे यांच्याशी भामट्यांनी संपर्क साधला होता . सर्व शिक्षण सोल्युशनच्या माध्यमातून तुमच्या मुलांना ने एल.एल.पी कंपनीकडून शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


लाखो रूपयांची शिष्यवृत्ती असल्याचे भासवून भामट्यांनी एका लिंकच्या आधारे प्रोसेसिंग फी च्या नावाखाली तब्बल २ लाख ७२ हजार ५०० रूपये ऑनलाईन भरण्यास भाग पाडले . वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून यासाठी संपर्क साधण्यात आला . तसेच वेगवेगळ्या बँक खात्यात हे पैसे वर्ग करण्यात आले . मुलांना शैक्षणिक खर्चासाठी लाखो रूपये मिळणार असल्याने पांडे यांनी ही रक्कम वर्ग केली.


वर्षभराचा कालावधी उलटूनही शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांनी वारंवार संपर्क साधला ,मात्र कुठलेही उत्तर मिळत नसल्याने आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर पांडे यांनी नाशिक सायबर पोलीसात धाव घेत तक्रार केलीये , सायबर सेलचे उपनिरीक्षक श्रीपाद परोपकारी आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


पांडे हे एकटेच नाही तर असे अनेक जण नाशिक शहरात आणि राज्यात फसवले गेल्याची शक्यता आहे. या कंपनीने अजून कोणाला फसवले असल्यास नाशिक पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन नाशिकच्या पोलिसांनी केले आहे . तसेच नवीन वर्ष सुरू होत असल्याने पुन्हा या कंपनीकडून उच्च शिक्षणासाठी अशी आमिषे दाखवली जाऊ शकतात त्यामुळे पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.