सावधान! नव्या वर्षाचा प्लॅन महागात पडू शकेल.
अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या नव्या वर्षाचे स्वागत करण्यास आपण उत्सुक आहात. सभारंभ आणि पार्टीची तयारी करत आहात तर सावधान..
मुंबई - अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या नव्या वर्षाचे स्वागत करण्यास आपण उत्सुक आहात. सभारंभ आणि पार्टीची तयारी करत आहात तर सावधान.. हा प्लॅन तुम्हाला महागात पडू शकतो. कारण, ओमायक्रॉनच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे.
मुंबईकरांना दक्षता घेण्याचे आवाहन करूनही त्यांच्याकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे कोणीही आणि कोणतेही नियम मोडलेले आढळल्यास कठोरपणे कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे.
नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील पथकांकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. नाताळ तसेच नवीन वर्ष प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गर्दी होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी कोरोनाची नवी नियमावली जाहीर केली आहे.
- नियम मोडणाऱयांवर कारवाई करण्यासाठी विभाग कार्यालय स्तरावर पथक
- लग्न व इतर समारंभांमध्ये उपस्थितीची मर्यादा काटेकोरपणे पाळावी
- बंदिस्त जागेत होणाऱ्या कार्यक्रम / समारंभ / उपक्रमासाठी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती
- खुल्या जागेत क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीला परवानगी
- १ हजारांपेक्षा अधिक उपस्थिती नियोजित असेल तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्व परवानगी आवश्यक
- हॉटेल्स, उपहारगृह, सिनेमागृह, मॉल्स यथे नियमांचे सक्तीचे पालन करावे
- नाताळ, नव वर्ष स्वागताचे समारंभ आयोजन टाळावे.
- मास्कचा वापर करावा, कोविड लसीकरण पूर्ण करुन घ्यावे.
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह इतर सार्वजनिक ठिकाणी लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच योग्य ती मुभा
- सार्वजनिक ठिकाणी / आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण आवश्यक. अन्यथा आस्थापनांवर दंडात्मक कारवाई.
- मुखपट्टी (मास्क) चा योग्यरितीने वापर करणे.