रेमडेसीवीरचा काळाबाजार, 5 हजार 400 ला एक इंजेक्शन
एका इंजेक्शनसाठी तब्बल 5 हजार 400 रुपये किंमत
बीड : बीड जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या (Remdesivir Injection) काळ्या बाजाराबद्दल मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. इथल्या लाईफ लाईन हॉस्पिटलशी संलग्न लाईफलाईन मेडिकलमध्ये रेमडेसिविरचा काळाबाजार पाहायला मिळाला. इथे एका इंजेक्शनसाठी तब्बल 5 हजार 400 रुपये किंमत आकारण्यात आली.
या किंमतीवर दोन इंजेक्शन विकल्याचे गुरुवारी समोर आले आहे. या प्रकरणात इंजेक्शन खरेदी करणारे संतोष सोहनी यांनी शहर पोलीसात तक्रार दिली आहे. बीड जिल्ह्यातच अन्न औषध प्रशासन विभागाच्या आशीर्वादानेच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याचे गुरुवारी पुन्हा स्पष्ट झाले.
येथील लाईफलाईन मेडिकलला रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा देण्यात आला होता. गुरुवारी संतोष सोहनी हे इंजेक्शन खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी गेले. त्यावेळी मेडिकलवाल्याने इंजेक्शनवर 5 हजार 400 इतकी किंमत असल्याचे सांगितले. आणि त्यांच्याकडून दोन इंजेक्शनसाठी 10 हजार 800 रुपये घेतले.
या प्रकारानंतर संतोष सोहनी यांनी बीड शहर पोलीसात तक्रार दिली आहे. या प्रकरणात चौकशी करुन पुढील कारवाई होईल असे शहर पोलीसांनी सांगितले.
रुग्णांच्या नातेवाईंकांचा ठिय्या
पुण्याच्या ससून रुग्णालयात तीन दिवसांपासून रेमडेसिवीर चे इंजेक्शन मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. पुण्यात रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. (Shortage of Remedicator in Pune) त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रेमडेसिवीर औषध मिळत नाही म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांचा ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला आहे. दरम्यान, संचारबंदी असतांना नातेवाईक मोठ्या प्रमाणात जमलेत आहेत. आता रेमडेसिवीर औषध उपलब्ध करुन देण्यात येईल की आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार याकडे लक्ष आहे. जर कारवाई केली तर परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.