आधी स्त्री, नंतर पुरुष आणि आता `बाप`माणूस; अग्निपरीक्षेत बीडचा ललितकुमार पास
Beed News Today: आत्ताच्या बदलत्या काळात विज्ञान खूप पुढे गेले आहे. बीडमधील एका महिला पोलिसाने लिंगबदल शस्त्रक्रिया करुन पुरुष होण्याचा निर्णय घेतला आहे.
विष्णू बुरगे, झी 24 तास
Beed News Today: 29 वर्ष स्त्री, नंतर पुरुष आता बाप माणूस अशा तीन भूमिका ही व्यक्ती जगली आहे. बीडच्या ललित साळवेला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. मुलाच्या जन्मानंतर आता त्याच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. ही गोष्ट आहे की लिंग बदल करुन ललिताचा ललितकुमार झालेल्या बीडच्या ललित साळवेची.
पोलीस दलामध्ये नोकरी करणाऱ्या ललिताने म्हणजेच आत्ताच्या ललितने समाज व्यवस्था, कुटुंब आणि प्रशासन या तिघांशी संघर्ष करत अग्नीपरीक्षा देऊन बाप बनण्याचं स्वप्न पूर्ण केल आहे. त्याच्या संघर्षाची कहाणी जाणून घेऊया. बीड जिल्हा पोलिस दलात मुलगी म्हणुन दाखल झालेल्या ललिता साळवे या महिला पोलिसांनी अनेक वर्षे महिला पोलिस म्हणून काम केले. मात्र आचनक शरीरातील पुरुषत्वाची जाणिव होवू लागल्याने त्यांनी लिंग बदल करण्याच्या निर्णय घेतला. मात्र या निर्णयाने पोलिस दलात खळबळ माजली.
लिंग बदल करुन जर पुरुष झाले तरी नोकरीवर रुजू होताना महिला म्हणून रुजू झाले होते. त्यामुळं या निर्णयामुळं नोकरीवर गदा येऊ शकली असती. त्यामुळं ललिताने न्यायालयीन संघर्ष केला आणि आपला निर्णय खरोखरच आमलात आणला. लिंगबदल शस्त्रक्रिया करुन पुरुष झाला तरी नोकरी जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळं महिला पोलिस असलेल्या ललितला ललितकुमार होता आले. त्यानंतर ललितकुमारने विवाह केला. आता त्यांच्या संसारात तिसऱ्या व्यक्तीनेही चाहुल दिली आहे.
स्त्रीचा पुरुष होऊनही समाजात तो मिळतोय. तो समाजामध्ये पुरुष म्हणून वापरतोय.समाजानेही पुरुष म्हणून त्याचा स्वीकार केला आहे. इतकंच नव्हे तर त्याला आता मुलगा देखील झाला आहे. त्यामुळे ललिता ते ललितकुमार झालेला व्यक्ती आज बाप माणूस झाला आहे. सामाजिक चौकटींना झुगारून ललिताच ललित कुमार होण्याचं स्वप्न काही वर्षांपूर्वी पूर्ण झालं होतं आता ललित कुमार बाप बनला आहे. त्यामुळे सामाजिक व्यवस्थेमध्ये एक नवीन क्रांतीचा पुन्हा एकदा नव्याने अध्याय जोडला गेला आहे. स्त्रीपासून पुरुषत्व मिळालेल्या ललित कुमारच्या जीवनामध्ये मुलाच्या जन्माने नवा आनंदाचा आला आहे. हा आनंद सामाजिक व्यवस्थांसाठी चिकित्सांचा विषय जरी ठरणार असला तरी विज्ञानाच्या या दुनियेत काहीही होऊ शकतं हे सिद्ध झालं आहे.