बीड : खेळाचे मैदान असो की चारा छावणी अथवा राजकीय मैदान, कोणतंही मैदान मारायला आपण तयार आहोत असा इशारा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये दिला. चारा छावणीच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. बॉल केव्हा-कसा-कुठे टाकायचा आणि खेळाडूचा स्टम्प कसा उखडून टाकायचा हे आपल्याला चांगलं माहिती असल्याचं त्या म्हणाल्या. काही लोक दुसरीकडे गेले, त्यांनी तिथं जाऊन मैदान मारण्याच्या गप्पा मारल्या आणि शून्यावर बाद झाले असे म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना नाव न घेता टोला लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिकडेच परळीत क्रिकेटचे सामने झाले. या सामन्यात पहिल्याच चेंडूवर धनंजय मुंडे झेलबाद झाले. शून्यावर बाद होऊनही ऐकतील ते धनंजय मुंडे कसले. क्रिकेटच्या सामन्यात शून्यावर आऊट झालो तरी राजकीय मॅचमध्ये प्रतिस्पर्ध्याला पहिल्याच चेंडूवर बाद करू असा विश्वास धनंजय मुंडेंनी बोलून दाखवला होता. क्रिकेटच्या सामन्याचा नेमका हाच धागा पकडून पंकजांनी धनंजय मुंडेंची विकेट काढली.


बीडच्या याच कार्यक्रमात एकेकाळी शरद पवार आणि अजित पवार यांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या आणि नुकतेच भाजपाकडून विधनपरिषदेवर निवडून गेलेल्या सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची हुबेहूब नक्कल केली. यावेळी धस यांनी आघाडी सरकारवर टीका केली.