`अण्णा माझे दैवत...` व्हिडीओ पोस्ट करणारा बीडचा गोट्या गीते आहे तरी कोण? आव्हाडांनी समोर आणलं वाल्मिक कराड कनेक्शन
Beed News : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एका महिन्याहून अधिक काळ उलटूनही आरोपींवर कठोर कारवाई मात्र होत नसल्यानं आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतलं आहे.
विशाल करोळे, झी मीडिया, बीड : (Beed News) बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दर दिवशी नव्या घडामोडी घडत असतानाच आता या साऱ्यामध्ये एका नव्या नावानं लक्ष वेधलं आहे. हे नाव आहे गोट्या गीते.
वाल्मिक कराड CBI कोठडीत असतानाच त्याचे समर्थक आता सोशल मीडियावर त्याच्या समर्थनार्थ पोस्ट करत असल्याचं समोर आलं आहे. बीडच्या गोट्या गीतेनं अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानं सध्या अनेकांचं लक्ष इथं वळलं आहे. 'अण्णा माझे दैवत, सदैव सोबत' असं एक रील त्यानं इन्स्टाग्रामवर टाकलं आहे. त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. गोट्या गीतेवर बीडमध्ये अनेक गुन्हे दाखल असून काही गंभीर गुन्हेही त्याच्यावर दाखल आहेत. पुण्यातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. गोट्या गीते हा परळीतील नंदागौळ इथला रहिवाशी आहे. गोट्या गीते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या जवळचा आहे का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनीही विचारला आहे.
गीते मतदान करत असतानाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल करत याला बूथ कॅप्चर म्हणायचे का? असाही सवाल आव्हाड यांनी केला आहे.
कोण आहे गोट्या गीते?
गोट्या गीते हा वाल्मिक कराड याचा अत्यंत विश्वासू सहकारी असल्याची चर्चा आहे. वाल्मिकच्या माध्यमातून त्याची धनंजय मुंडे यांच्यासोबत जवळीक असल्याचंही म्हटलं जात असून, ज्ञानोबा उर्फ (गोट्या) मारुती गीते असं त्याचं नाव.
हेसुद्धा वाचा : राष्ट्रवादीची मुन्नी कोण? प्रश्नावर अजित पवार संतापले; धसांचं नाव घेत म्हणाले, 'असल्या फालतू...'
गोट्या गीते हा परळी च्या नंदागौळ येथील रहिवासी आहे, गेले 15 वर्षापासून विविध गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. चोऱ्या करणे, धमकावणे यासह गावठी कट्टे बाळगणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. हे गुन्हे बीड जिल्ह्यासह पुण्यातही दाखल असल्याचे समजते. अलीकडे परळीत झालेल्या सरपंच बापू आंधळे खून प्रकरणात महादेव गीते नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता, पुढे महादेव गीते याने गोट्या गीतेचे नाव घेतले होते आणि त्यानंतर त्याच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता. बीड जिल्ह्यात गावठी कट्टे विक्री करणारे एक रॅकेट आहे, त्यातही याचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे.