Walmik Karad Demad: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मागील काही आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडने केजमधील सत्र न्यायालयामध्ये एक विनंती अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी, 31 डिसेंबर रोजी वाल्मिकी कराड सीआयडीला शरण आला असून त्याला सध्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे. संतोष देशमुख हत्येशी संबंधित थेट आरोपींच्या यादीत वाल्मिकी कराडचा समावेश नसला तरी याचसंदर्भातील खंडणी मागण्याबरोबरच अन्य 15 गुन्ह्यांखाली त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आता अटकेत असताना वाल्मिक कराडने त्याला एक विशेष मशीन हवं असल्याचं न्यायालयाला केलेल्या विनंतीत म्हटलं आहे. या विनंती पत्रामध्ये वाल्मिक कराडने त्याला एक गंभीर आजार असल्याचंही सांगितलं आहे.


नेमकी काय मागणी केलीय वाल्मिक कराडने?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडच्या खंडणी गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडकडून उपचारबाबत विनंती करणारा एक अर्ज केज सत्र न्यायालयात दाखल केला आहे. आपल्याला स्लीप अ‍ॅप्नीया नावाचा आजार असल्याचा दावा वाल्मिकीने केला आहे. हा आजार असलेल्या रुग्णाला ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावली जाते. ही मशीन कोठडीत असताना आपल्याला दिली जावी अशी मागणी वाल्मिक कराडने केली आहे. एवढ्यावरच न थांबता कराडने ही मशीन लावण्यासाठी 24 तास एक मदतनीस हवा असल्याचंही या विनंती अर्जात म्हटलं आहे.


स्लीप अ‍ॅप्नीयावरील उपचारासाठी वापरली जाणारी सीपॅप मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची कराडची मागणी आहे. यापूर्वीच कराडने एक विनंती पत्र लिहून आधी जेवायला खिचडी द्यावी अशा पद्धतीची मागणी केली होती. त्यामुळेच आता कराडच्या इच्छांची यादी वाढतच चालल्याचे चित्र दिसत आहे.


स्लीप अ‍ॅप्नीया म्हणजे काय?


स्लीप अ‍ॅप्नीयामध्ये हा आजार ऑब्सट्रक्टिव स्लीप अ‍ॅप्नीया, सेंट्रल स्लीप अ‍ॅप्नीया व कॉन्प्लेक्स स्लीप अ‍ॅप्नीया या तीन प्रकारचा असतो. यापैकी ऑब्स्ट्रक्टीव्ह स्लीप अ‍ॅप्नीया सर्वात सामान्य प्रकारचा आजार आहे. यामध्ये झोपल्यावर नाकामध्ये एअर फ्लो कमी होतो. ऑब्सट्रक्टिव स्लीप अ‍ॅप्नीयामध्ये नाक आणि तोंडाच्या वरच्या भागामध्ये हवा भरली जाते. श्वास घेण्याच्या नलिकेमध्ये हवेचा फ्लो कमी झाल्याने श्वाच्छोश्वासात अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच श्वास घ्यायला त्रास होतो. एका रिपोर्टनुसार, स्लीप अ‍ॅप्नियाची 90-96 प्रकरणं ही ऑब्सट्रक्टिव स्लीप अ‍ॅप्नीयाची असतात. याची लक्षणं पाहूयात...


वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करा


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरच्या रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असून यांच्यावर 302 चा गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात 7 तारखेला सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने लातूर शहरात एक बैठक पार पडली. या बैठकीत एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला आहे. हा चक्काजाम सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या बैठकीनंतर देण्यात आली आहे.