COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड : बीडमध्ये एक अनोखा लग्नसोहळा पार पडला. पाहूया काय आहे या लग्नाची खास बात. तुम्ही लग्नसोहळे अनेक पाहिले असतील मात्र, या लग्नसोहळ्याची गोष्ट काहीशी वेगळी आहे.


लग्नाच्या मंडपात लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींची तपासणी करण्यात येतेय. इथं कुठल्या संस्थेने या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं असेल असा तुम्हाला वाटेल. मात्र, वधू-वराच्या कुटुंबीयांनीच हा निर्णय घेतला.


बीडच्या अंबादास जाधव यांची कन्या डॉ. रोहिणी हिचा  विवाह जालना इथल्या डॉ. योगेश पडोळ यांच्याशी ठरला. जाधव कुटुंबात मुलं, मुली, सूना, जावई मिळून दहा डॉक्टर आहेत. मुलीच्या लग्नात घरच्या सर्व डॉक्टर मंडळींनी लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची आरोग्य तपासणी करावी असा निर्णय घेतला. 


नववधू-वरासह दोन्ही कुटुंबाचा याला पाठिंबा लाभला. त्यानुसार मोठ्या थाटामाटात पार पडलेल्या या सोहळ्यावेळी वऱ्हाडी मंडळींची आरोग्य तपासणीही करण्यात आलीय. 


वऱ्हाडी मंडळींच्या आरोग्य तपासणीसह या ठिकाणी विविध सामाजिक संदेशही देण्यात आले. वृक्ष संवर्धन, बेटी बचाओ-बेटी पढाओ आणि पाणी वाचवाचे संदेश या सोहळ्यात लावण्यात आले होते. हे अनोखं आणि हटके लग्न पाहून वऱ्हाडी मंडळीही भारावून गेल्याचं पाहायला मिळालं.


लग्न सोहळ्यात बडेजावपणा, पैशाची उधळपट्टी मोठ्या प्रमाणे आपण पाहतो. मात्र, बोहल्यावर चढण्याआधी रोहिणी जाधव आणि योगेश पडोळ या डॉक्टरांनी मंडपात राबवलेला हा उपक्रम नक्कीच स्तुत्य तसंच कौतुकास्पद म्हणावा लागेल.