विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमला दूर केलं आहे. आगामी विधानसभा निवडणूकांवर कसा याचा परिणाम होईल, वंचीत आणि एमआयएमला यातून तोटा होणार की फायदा या सगळ्यांची चर्चा आता सुरु झाली आहे. विधानसभेत दोघांचीही ताकद सारखी असल्याचा एम आयएमचा दावा आहे. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये बहुसंख्य मुस्लीम काँग्रेससोबत गेलेत, तर बहुसंख्य दलित मतं मात्र वंचित आघाडीला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका संशोधनानुसार लोकसभा निवडणुकीत एकूण मुस्लीम मतांपैकी 85 टक्के मत काँग्रेसला, 14 टक्के मतं युतीला आणि 1 टक्के मतं इतरांना मिळाल्याचं दिसतं आहे. तर राज्यातील बौद्ध मतांपैकी 81 टक्के मतं वंचितला, मिळाली आणि काँग्रेस आणि युतीला त्या तुलनेने कमी मतं मिळाली असल्याचं दिसंतं आहे. 


2019 ची लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहता मुस्लीम धर्मियांचा पाठिंबा वंचितला नव्हताच, तर तो काँग्रेसला असल्यातं दिसतं आहे. तर दलित मतं मोठ्या प्रमाणात वंचितला मिळाली असल्याचं ही दिसतं आहे. त्यामुळंच आंबेडकरांना एमआयएममध्ये आता रस नाही. अशी चर्चा आहे. 


वंचित स्वत:च मुस्लिमांना उमेदवारी देते, मग एमआयएमला इतक्या जागा हव्या तरी कशाला असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटल्याचं कळतं आहे. त्यामुळं आता एमआयएम मात्र तयारीला लागंली आहे. या सगळ्यात नुकसान दोघांचही अटळ असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार व्यक्त करत आहेत.
 
वंचित सोबत सगळे संबंध तुटलेत, असं एमआयएमनं सांगितलं तरी आंबेडकर म्हणतात आमची ती डिप्लोमसी आहे. औरंगाबादेतून एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले, त्यांना दलित, मुस्लिमांची मतं मिळाली मात्र आंबेडकरांना अकोला आणि सोलापूर दोन्ही ठिकाणी मुस्लिमांची मतं मिळाली नाहीत, ही सल बाळासाहेबांच्या मनात आहे. त्यावर सध्या आंबेडकरांचं फक्त नो कमेंटस एवढंच उत्तर आहे. 


एमआयएमकडे सध्या २ आमदार, नगरपालिका, नगर परिषद आणि महापालिकांमध्ये दीडशे नगरसेवक, एकट्या औरंगाबादमध्ये २६ नगरसेवक आहेत. २०१४ च्या निवडणुकीत एमआयएमनं २४ जागा लढवल्या होत्या. 8 ठिकाणी एमआयएमचे उमेदवार दुस-या आणि तिस-य़ा क्रमांकावर होते, एमआयएमच्या मतांचा टक्का 00.93 टक्के इतका होता. तर भारिपकडे 1 आमदार, 46 नगरसेवक, 61 पंचायत समिती सद्स्य आणि एक जिल्हा परिषद अध्यक्ष आहे.


लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या 48 मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना 41 लाखं मत मिळाली होती, त्यात एमआयएम सुद्धा सोबत होतं. 2014च्या विधानसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांच्या भारीपनं 170 जागा लढवल्या होत्या, आणि त्यांन 4 लाख 60 हजार मतं मिळाली होती. मात्र एमआयएम 24 जागांवर लढले होतेआणि त्यांनी 4 लाख 99 हजार मतं मिळवली होती.


ही आघाडी फुटल्यानं युतीला सर्वाधिक फायदा होणार आहे. आता पुढे ओवेसी आणि आंबेडकर काय निर्णय़ घेतात यावंरच पुढची समीकरणं अवलंबून आहेत..