तुषार तपासे, झी मीडिया, सातारा :  सध्याच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे चारचाकी वाहन आहे. अनेक जण लांब पल्ल्याच्या प्रवासात गाडीतच झोप घेणं पसंत करतात. काही जणांना गाडीच्या काचा पूर्णपणे बंद करुन झोपण्याची सवय असते. पण तुम्हाला अशी सवय असेल तर सावधान, अशी झोप तुमच्या जीवावर बेतू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीत झोपल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला, रवींद्र शेलार असं मृत व्यक्तीचं नाव असून  कारांडवाडी इथं हा धक्कादायक प्रकार घडला. रवींद्र शेलार दोन दिवसांपूर्वी मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेले होते, मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. गाडीत त्यांचा मृतदेह सापडला. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यानं त्यांना जीव गमवावा लागल्याचं समोर आलं आहे.


मृत्यूपूर्वी रवींद्र शेलार यांनी मद्यपान केलं होतं. याआधीही अशाच प्रकारे गाडीत बंद झाल्यानं काही चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकानं काळजी घेणं आवश्यक आहे. 



गाडीत झोपताना काय काळजी घ्याल ?


गाडीच्या काचा बंद केल्यानंतर गाडीतला ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी काचा काही प्रमाणात उघड्या ठेवा. ऑटोलॉक सिस्टममुळे बहुतांश गाड्या इंजिन बंद करताच काही सेकंदात लॉक होतात. त्यामुळे लहान मुलांना जपा. तुमच्या नकळत मुलं गाडीत तर खेळत नाहीत नाहीत ना याकडे लक्ष द्या. मद्यपान करून गाडी चालवू नका आणि गाडीत झोपूही नका. 


त्यामुळे गाडीच्या काचा बंद करुन झोपण्याची सवय तुम्हाला असेल तर ती लगेच बदला. कारण तुमची एक छोटीशी चूक तुमच्या जिवावर बेतू शकते.