बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी महिलांनी अंगावरच्या साडीचा केला दोर; एक वाचला, पण...
Bhandara News : भंडाऱ्यात कासव पकडण्याच्या नादात दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कासव पकडण्यासाठी तिघेजण विहीरात उतरले होते. मात्र गुदमरल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात यश आले आहे.
प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : कासव (turtl) पकडण्याच्या नादात दोन तरुणांनी प्राण गमावल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. विहीरीतील कासव पकडण्यासाठी तीन तरुणी विहीरीत (well) उतरले होते. मात्र जीव गुदरमरल्याने दोघांचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी असलेल्या महिलांनी कशाचीही पर्वा न करता स्वतःच्या साडीचा दोर तयार करत एकाचे प्राण वाचवले आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. भंडारा (Bhandara News) जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मोगरा-कनेरी-गढपेंढरी शेतशिवारात ही घटना घडली आहे. मंगेश जय गोपाल गोंधुळे (मेंढा भुगाव) आणि दयाराम सोनीराम भोंडे (मेंढा भुगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर सुधीर मोरेश्वर हजारे असे युवकाचे नाव आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. यासोबतच ग्रामीण भागात धान रोवणीसाठी लगबग सुरू आहे. धान रोवणीसाठी मजूर मिळत नसल्याने इतर गावातील मजूर आणले जाता आहे. अशातच भंडाऱ्यातील गढपेंढरी येथील एका शेतकऱ्याने शेतात धान रोवणीसाठी मजुरांना आणलं होतं. रोवणीसाठी लाखनी तालुक्यातील भुगाव मेंढा येथील 15 पुरुष आणि स्त्रियांना गढपेंढरी येथे आणण्यात आले होते. शेतात लावणीचे काम सुरु होतं.
शेतात रोवणी सुरू असतानाच जवळच असलेल्या पडक्या विहिरीत तीन मजुरांना कासव दिसला. त्यानंतर तिघेही तो कासव बाहेर काढण्यासाठी विहीरीत उतरले होते. मात्र विहीरीत वायू असल्यामुळे तिघांनाही श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. जीव गुमदरु लागल्याने तिघांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार तिथेच काम करणाऱ्या मजूर महिलांना लक्षात येताच त्यांनी आरडा ओरडा केली. मात्र त्यांना वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे साहित्य तिथे उपलब्ध नव्हते. त्यामुळे महिलांनी कशाचीही पर्वा न करता स्वतःच्या अंगावरील साड्या काढल्या आणि त्याचा दोर तयार करुन तो विहीरीत सोडला.
दरम्यान, विहीरीतल्या एका मजुराने हा दोर पकडला आणि तो वर आला. मात्र दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह विहीराबाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.
हिंगणघाटमध्ये सायकलने जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू
वर्ध्याच्या हिंगणघाट येथे शिकवणी वर्गाला जात असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिंगणघाट शहरातील नागपूर - हैद्राबाद महामार्गावर लक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ सकाळी ही घटना घडली. या अपघातात विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. आंजती या गावाहून हिंगणघाट शहरात शिकवणी वर्गाकरीता हा विद्यार्थी येत होता. सायकलने रस्ता पार करताना भरधाव येणार्या ट्रकने जबर धडक दिल्यामुळे मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे.