जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, भंडारा : पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भंडारा जिल्ह्यातील पवनीतील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना वीरमरण आले. त्यांच्या मृत्यूनं संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरलीय. 


पाकिस्तानकडून हल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडारा जिल्ह्यातील पवनीचे सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद झाल्याची बातमी कळताच कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला.  मेजर प्रफुल्ल मोहरकर २०१२ साली सैन्यात रुजू झाले होते. २३ डिसेंबरला जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यातल्या केरी सेक्टरमध्ये कुरापती पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन करण्यात आलं. त्याला प्रत्युत्तर देताना मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना वयाच्या ३२ व्या वर्षी वीरमरण आलं. 


लग्नाचा वाढदिवस


तीन वर्षांपूर्वी प्रफुल्ल यांचं लग्न झालं होतं. २५ डिसेंबरला त्यांच्या लग्नाला तिन वर्षं पूर्ण होणार होती. मात्र लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच त्यांच्या संसाराची वाट अधुरी राहिली. भारतमातेसाठी बलिदान देणा-या लेकाचा सार्थ अभिमान असल्याचं प्रफुल्ल मोहरकर यांच्या वीरमातेने म्हटलंय. आणखी किती भारतीय जवान शहिद होणार असा सवालही या वीरमातेनं विचारलाय. 


मोठी नोकरी सोडूण भारतीय सैन्यात


शिक्षक असलेले प्रफुल्ल यांचे आईवडील पवनीत मुक्कामी होते. पवनीतल्या वैनगंगा शाळेत प्रफुल्ल यांनी शालेय शिक्षण घेतलं. पुढच्या शिक्षणासाठी नागपूर आणि त्यानंतर पुण्यात इंजिनीअरिंगचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. सुरवातीपासूनच भारतीय सैन्याचे आकर्षण असलेले प्रफुल्ल इंजिनीअर झाल्यानंतर सुखाची नोकरी नाकारुन, भारतीय सैन्यात २०१२ मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले. शहीद मेजर प्रफुल मोहरकर बालपणापासूनच मनमिळाऊ स्वभावाचे असल्याचं, त्यांचे मित्र आणि नातेवाईकांनी सांगितलं. 


आपल्या गावच्या सुपुत्राला आदरांजली देण्यासाठी पवनीमधल्या व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवला होता. कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या शहीद प्रफुल्ल मोहरकरांना झी 24 तासचा सलाम...