Bhayandar Railway Station Son Father Died Video: मुंबईतील भाईंदर या उपनगरामध्ये मागील आठवड्यात रेल्वे स्थानकाजवळ पिता-पुत्राने केलेल्या आत्महत्या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. या पित्रा-पुत्राच्या जोडीने धावत्या लोकल ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली होती. 8 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या दोघांनी शेअर बाजारात झालेला तोटा अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता मरण पावलेल्या हरीश मेहता (वय 60) यांच्या सूनेनं दिलेल्या माहितीमुळे सदर प्रकरणातील गूढ वाढलं आहे. वसई पोलीस हरिष आणि त्यांचा मुलगा जय मेहता (वय 30) यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत असतानाच ही माहिती समोर आली आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसईमधील वसंत नगरी येथे वास्तव्यास असलेले हरीश आणि त्यांचा मुलगा जय हे दोघे सोमवारी सकाळी साडेअकराच्या आसपास भाईंदर रेल्वे स्टेशनवर आले. हे दोघे प्लॅटफॉर्मवरुन नायगावच्या दिशेने चालू लागले. प्लॅटफॉर्म संपल्यानंतर ते रेल्वे रुळावर उतरले आणि लोकल ट्रेन अवघ्या काही फुटांवर असताना ते येणाऱ्या लोकल समोर झोपले. लोकल ट्रेन अंगावरुन गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सदर घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या दोघांनी अगदी शांत डोक्याने नियोजनपूर्वक पद्धतीने स्वत:ला संपवल्याचं दिसून आलं. मात्र दोघांनी आत्महत्या का केली याचा तपास पोलीस सध्या करत आहे. पोलिसांनी मंगळवारी म्हणजेच 9 जुलै रोजीच दोघांचे मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिले. या दोघांवर अंत्यसंस्कारही झाले. मात्र आता या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आली आहे. 


सूनेनं दिली महत्त्वाची माहिती


मेहतांच्या घराची झडती घेतल्यानंतर आत्महत्येपूर्वी लिहिलेली इंग्रजीमधील एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. यामध्ये 'या प्रकरणासाठी आम्ही स्वत: जबाबदार आहोत,' नमूद करण्यात आलं आहे. कर्जबाजारीपणामुळे मेहता पिता-पुत्रांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र पोलिसांना या दोघांच्याही बँक अकाऊंट्स, ईमेल आणि इतर तपशीलामध्ये त्यांच्यावर कर्ज असल्याचं कुठेच दिसून आलेलं नाही. त्यामुळे या दोघांनी नेमकं स्वत:ला का संपवलं? दोघांनी हे टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण काय आहे? याबद्दल तर्क-वितर्क मांडले जात आहेत. त्यातच मेहता यांच्या सुनेनंही पोलिसांना दोघांवरही कोणथ्याच प्रकारचं कर्ज नव्हतं असं सांगितलं. मग या दोघांनी स्वत:ला का संपवलं हे गूढ अद्याप कायम आहे. 


मोबईलमध्ये काय सापडलं?


पोलिसांनी आता या दोघांच्या खासगी वस्तू तपासण्याच सुरुवात केली आहे. पोलिसांनी जय आणि हरीश यांचे मोबाईल तपासून पाहिले आहेत. यामध्ये हरीश हे शेअर बाजारासंदर्भातील काम करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र आत्महत्या करण्यामागील कारणाचे कोणतेही पुरावे किंवा संकेत या दोघांच्या मोबाईलमधून मिळालेले नाहीत. वसई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी अद्याप दोघांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही, असं सांगितलं आहे. आता या दोघांबरोबर नेमकं असं काय घडलं की त्यांनी थेट टोकाचं पाऊल उचललं हे अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहत आहेत.