बुलडाणा : यंदाच्या वर्षी पाऊस  समाधानकारक राहील असं भाकित विदर्भातील भेंडवळ गावच्या घटमांडणीत वर्तवण्यात आलंय. देशावर यंदा दुष्काळाचं सावट नसल्याचंही या भविष्यवाणीचं म्हणणं आहे. पण अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणत पिकांचं नुकसान होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आलीय. शिवाय देशाचा राजा कायम राहिल पण ताणतणावही कायम राहण्याचा अंदाज भेंडवळमध्ये व्यक्त करण्यात आलाय. 


काय आहे ही पद्धत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भेंडवळ ही पद्धत पूर्वीपासून सुरु आहे. अक्षयतृतीया या दिवशी संध्याकाळी पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत नियोजित शेतात पोहोचतात. त्या ठिकाणी मातीचे गोल घट करून घटाच्या मधोमध खड्डा करतात यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्याचे प्रतिक म्हणून चार मातीची ढेकळे ठेवतात. त्यानंतर त्यावर घागर ठेवण्यात येते. 


या घागरीवर पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, करंजी, भजे आणि वडा अशा प्रतिकात्मक खाद्यपदार्थांची मांडणी केली जाते. तर खड्डयात घागरीच्या बाजुला राजा व त्याची गादी म्हणजे पान सुपारी ठेवली जाते. मातीच्या घटामध्ये गोलाकार पद्धतीने अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कपासी, हिवाळी मुंग, उडीद, करडी, तांदूळ, जवस, तीळ, मसूर, हरभरा, वाटाणा आदी १८ प्रकारच्या धान्याची मांडणी करतात.


धान्य आणि खाद्य पदार्थांचा वापर करून या घटमांडणीतून झालेल्या बदलाचे दुसर्‍या दिवशी पहाटे अतिशय चांगले अवलोकन केले जाते आणि त्यावरून भाकित वर्तविले जाते. मगच शेतकरी पेरणीची दिशा ठरवतो.