पुणे : पुणे सत्र न्यालायानं आनंद तेलतुंबडे यांना दिलासा दिला आहे. आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना ४ आठवड्यांचा दिलासा दिला आहे, त्यामुळे त्यांना सोडून देण्यात यावे, असे आदेश पुणे सत्र न्यायालयानं दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून आनंद तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना अटकपूर्व किंवा अंतरिम जामिनासाठी ४ आठवड्याचा कालावधी देण्यात आला होता. तो संपायला आणखी एक आठवडा बाकी असताना अटक करण्यात आली. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं अटक केली आहे, असा दावा तेलतुंबडेंच्या वकिलांनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलतुंबडे यांच्या वकिलांचा दावा सरकारी वकिलांनी फेटाळून लावला. तेलतुंबडेंना अटक करू नका, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हणलं नसल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. तसंच तेलतुंबडेनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, जामीन नाकारण्यात आल्यानंतरच त्यांना अटक करण्यात आली आहे. ४ आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता, हे खरे आहे. पण जामीन फेटाळल्यानंतरही त्यांना अटक करू नये, असा त्याचा अर्थ होत नाही, त्यामुळे पोलिसांनी केलेली अटक योग्य आहे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. पण सरकारी वकिलांचा युक्तीवाद न्यायालयाला मान्य झाला नाही, आणि त्यांनी आनंद तेलतुंबडेंना सोडून द्यायचे आदेश दिले.


कोरेगाव भीमा प्रकरणी घेण्यात आलेल्या एल्गार परिषदांमध्ये हात असल्याच्या आरोपाखाली आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून अटक करण्यात आली होती.  पुण्याच्या सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी पुणे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. विलेपार्ले येथील घरातून त्यांना अटक करण्यात आली.


पुण्यातील सत्र न्यायालयाने शुक्रवारी तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला होता. पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र कोणत्याही बेकायदा कारवाईत आपण सहभागी झालो नसल्याचा आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी संबंध नसल्याचा दावा तेलतुंबडे यांनी केला होता. त्यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने २१ डिसेंबरला त्यांची याचिका फेटाळून लावली होती.


कोण आहेत आनंद तेलतुंबडे?


कोरेगाव भीमा हिंसाचारासाठी मोठं षडयंत्र रचण्यात आलं असून, त्याचे अत्यंत गंभीर परिणाम झाल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं होतं. प्रा. आनंद तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास नकार देताना उच्च न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं होतं. आनंद तेलतुंबडे हे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बहिणीचे पती आहेत.


दरम्यान या प्रकरणात 'आपल्याला नाहक या प्रकरणात गुंतवण्यात आलंय, घटनेवेळी आपण गोव्यात होतो तसंच पोलिसांकडे आपल्याविरुद्ध सबळ पुरावे नाहीत', असा दावा करत तेलतुंबडे यांनी प्रकरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता.