निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यातील डोंगर रांगा गुणकारी असणाऱ्या करवंदांनी बहरल्या आहेत. सध्या बाजारात करवंदांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दुर्गम भागातील शेकडो जणांच्या हाताला चांगला रोजगार मिळणार आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगरमधील व्यापारी करवदांची प्रतवारी उकृष्ट असल्याने तालुक्यातील बाजारपेठेतून करवंदांची चांगली खरेदी होते. करवंद विक्रीतून तालुक्याची आठवड्याला लाखोंची उलाढाल होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोर आणि वेल्हा तालुका डोंगरी पट्टा - 


भोर आणि वेल्हा तालुक्याचा पश्चिम आणि दक्षिण पट्टा डोंगरी आणि दुर्गम असल्याने अनेकजण बेरोजगार आहेत. उन्हाळा सुरु झाला की  डोंगर दऱ्यातील करवंदे तोडून शहरातील बाजारात विक्री करुन मिळणाऱ्या तुटपुंज्या फायद्यातून वर्षभराची उपजीविका या भागातील नागरिक करतात. करवंद बाजारात उन्हाळ्याच्या शेवटी एप्रिल- मेच्या दरम्यान येते. सध्या करवंद तोडणी सुरु असून भोर आणि महाडमधील बाजार पेठांच्या माध्यमातून राज्यभर करवंदची विक्री होतं आहे. त्याचबरोबर तालुक्यात अनेक पर्यटनस्थळ असल्यामुळे येणारे पर्यटक जास्त दरात करवंद खरेदी करतात, करवंदांना भावही चांगला मिळत असल्याने या भागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होतं आहे.


करवंद म्हणजे नेमकं काय?


डोंगरदऱ्यात, रानावनात मुक्तपणे वाढणारी, पाण्याची जास्त मागणी नसणारी, आपल्या सदाहरीत काटेरी झुडुपांनी निसर्गाला हिरवाईने समृद्ध करणारी झुडुपवर्गीय वनस्पती म्हणून करवंदाची ओळख आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातील आदिवासी यांना उत्पन्नाचा स्रोत म्हणून पिकवलेली करवंद उपयोगी असतात. मात्र त्याचबरोबर करवंदच्या कच्च्या फळाचे लोणचं,मुरंबा या गोष्टी बनवून ठेवता येतात. या फळांपासून सरबत,जाम, जेली या मूल्यवर्धन करणाऱ्या गोष्टी अधिक उत्पन्न देऊ शकतात.आदिवासी भागात कच्च्या करवंदाची चटणी आणि पिकवलेल्या करवंदाची कढी असे पदार्थ तयार केले जातात. तसंच आयुर्वेदातही करवंदाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.