कोल्हापुरात भूमाता ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा माधुरी शिंदेची हत्या
हे कृत्य केल्यावर सूर्यकांत याने जयसिंगपूर पोलिसांत जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
कोल्हापूर: तृप्ती देसाई यांच्या भूमाता बिग्रेडच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा माधुरी शिंदे यांची हत्या करण्यात आली आहे. माधुरी शिंदे यांच्या पतीनेच त्यांची निर्घृण हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिरोळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या अशी माधुरी शिंदे यांची ओळख होती. पतीने कुहाऱ्डीचे वार करून त्यांचा खून केला. चारित्र्याच्या संशयावरून पतीने खून केल्याच पोलिसांनी सांगितल. याप्रकरणी मुलीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी सूर्यकांत शिंदे (वय ४०) याला पोलिसांनी अटक केली आहे.
हत्या करून पतीने दिली पोलिसात कबुली
प्राप्त माहितीनुसार माधुरी शिंदे या नेहमी सामाजिक कार्यात अग्रभागी असत. त्यांना समाजकार्याची आवड होती. मात्र, मोलमजुरी करणाऱ्या त्यांच्या पतीस माधुरी यांचे समाजकार्य मान्य नव्हते. त्यामुळे पती-पत्नीत नेहमीच खटके उडत असते. घटना घडली त्यावेळी सकाळच्यासुमारास पती सूर्यकांत हा कुऱ्हाड सोबत घेऊन घरात आला. घरकामात असलेल्या पत्नी माधुरी हिच्यावर त्याने कुऱ्हाडीने सपासप वार केले. सुर्यकांत यांनी माधुरी यांच्या मानेवर, गळ्यावर आणि डोक्यात असे तीन वार केले. घाव वर्मी लागल्याने माधुरी यांचा जागीच मृत्यू झाला. हे कृत्य केल्यावर सूर्यकांत याने जयसिंगपूर पोलिसांत जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
माधुरी शिंदे अल्पपरीचय
शिरोळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या अशी ओळख.
तृप्ती देसाई यांच्या भूमाता बिग्रेड संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्ही उपाध्यक्षा होत्या.
शिरोळ तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या छत्रपती गृपच्याही त्या उपाध्यक्षा होत्या.