ठाण्यात साकेत पुलाला मोठा तडा, तर राबोडीत भींत कोसळली
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
ठाणे : ठाण्यातल्या भिवंडी साकेत पुलावर मोठी चीर गेली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुंब्रा बायपास रोडही बंद असल्यामुळे साकेत पुलावरून जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. या पुलाला तडे गेल्यानंतरही वाहतूक सुरुच आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठी दुर्घटना झाल्यावरच जाग येणार का अशी विचारणा होतेय... लवकरात लवकर या पुलाची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
ठाणे आणि कळवा परिसरातही जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे कळव्यात जमीन खचली आहे. जमीन खचल्यानं तीन घर नाल्यात पडली आहेत. सुदैवानं य़ात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कळवा पूर्व घोळाई नगर येथे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर प्रशासनानं नाल्याच्या बाजूला असलेल्या घरांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
ठाण्यातील राबोडी भागात ३० फूट उंचीची भींत कोसळली आहे. यात चार दुचाकी आणि एका रिक्षाचं नुकसान झालं आहे. कोकणी कबरस्थानची ही भींत आहे. सुदैवान या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ढिगारा उपसण्याचं काम सुरु आहे.