मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र सरकार स्थापन करेल अशी चर्चा आणि हालचाली सुरु असताना आज सकाळी अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सकाळी सकाळी ही बातमी आल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या. अजित पवार हे भाजपसोबत गेले आहेत. पण याला शरद पवार यांची संमती होती का याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण जर शरद पवार यांना न विचारता हा निर्णय अजित पवार यांनी घेतला असेल तर राष्ट्रवादीला मोठा खिंडार पडलं असंच म्हणावं लागेल. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांनी म्हटलं की, चर्चेला कंटाळून हा निर्णय घेतला आहे. पण एका रात्रीत एवढा मोठा निर्णय घेतला जावू शकत नाही. त्यामुळे शिवसेनेसोबत एकीकडे चर्चा सुरु असताना अजित पवार यांची भाजपसोबत छुपी चर्चा सुरु होती का अशी शंका या निमित्ताने आता उपस्थित होत आहे.



अजित पवार यांच्यासोबत फक्त पार्थ पवार राजभवनात दिसत होते. त्यामुळे राष्ट्रवादीमधून एक मोठा आमदारांचा गट घेऊन ते अजित पवार हे भाजपसोबत जातात तर शरद पवार यांना राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असेल.


'निवडणुकीचा निकाल लागून बरेच दिवस झाले तरी सरकार स्थापन होत नव्हतं. शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांसाठी लवकर स्थापन करण्याचा निर्णय़ घेतला. 3 पक्ष एकत्र येत चर्चा सुरु असताना वेगवेगळ्या मागण्या सुरु होत्या. चर्चेला कंटाळून भाजपला पाठिंबा दिला. राज्यात स्थिर सरकार येणं महत्त्वाचं होतं.' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.