मोठी बातमी: उद्धव ठाकरे यांनी मागितल्या शिंदेंच्या विभागाच्या फाईली
एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चाचपणी.
मुंबई : राज्याच्या राजकारणातून आणखी एक मोठी घडामोड समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विभागाच्या फाईली मागवल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी कोणकोणते निर्णय घेतले आहेत याबाबत मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतली जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे आता शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे जवळपास शिवसेनेचे 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार घेऊन गुवाहाटी या ठिकाणी थांबले आहेत. त्यांना आणखी काही आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या निलंबनाची मागणी शिवसेनेने केली होती. पण सुप्रीम कोर्टाने याच्या विरोधात निर्णय दिला आहे. 11 जुलै रोजी यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर देखील दावा केला आहे. आपण शिवसेना सोडून कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याची मागणी केली आहे. पण उद्धव ठाकरे यांना ही मागणी मान्य नाही.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या बंडखोरी विरोधात शिवसैनिकांचं आंदोलनसुरु आहेत. तर शिंदे समर्थक देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत.