Big Relief To Teachers And Students In Mumbai: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंच्या प्रयत्नांमुळे राज्यातील शालेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांना निवडणूक काळात मोठा दिलासा मिळणार आहे. राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरेंनीच यासंदर्भात एका पोस्टमधून माहिती दिली आहे. राज ठाकरेंनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एक पत्रक जारी करत महत्त्वाचा आदेश दिला आहे.


काय म्हणाले अमित ठाकरे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित ठाकरेंनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाच्या प्रतीच्या 2 पानांचा फोटो पोस्ट केला आहे. हे पत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबरच मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील जिल्हाधिकारी वर जिल्हा निवणूक अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. अमित ठाकरेंनी या आदेशाचा फोटो शेअर करताना, "शालेय शिक्षकांना निवडणुकीची कामे करण्यास भाग पाडले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हा मुद्दा चार दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मीडियासमोर मांडला होता. राज ठाकरेंच्या आदेशानुसार दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची भेट घेऊन "कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये" अशी भूमिका आग्रहपूर्वक मांडली आणि केवळ शिक्षकांवर अवलंबून न राहता पर्यायी व्यवस्था उभारताना माजी शासकीय कर्मचारी आदींनाही सामावून घ्यावे, अशी सूचना केली होती," असं म्हटलं आहे.


नेमका आदेश का?


"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आग्रहामुळे काल (22 फेब्रुवारी 2024 रोजी) रात्री उशिरा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 'मुंबईचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी तातडीची बैठक घेऊन शिक्षकांना वगळून अन्य कर्मचारी अधिगृहीत करण्याबाबतच्या सर्व शक्यता तपासून तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घ्यावा' असा आदेश दिला आहे," अशी माहिती अमित ठाकरेंनी दिली.


नक्की वाचा >> 'बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून..'; मनोहर जोशींच्या निधनावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया


विद्यार्थी शिक्षकांना काय फायदा होणार?


"इच्छुक सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना बीएलओ ड्यूटी देण्याबाबतचा पर्याय वापरण्यात यावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे, "शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस निवडणुकीशी संबंधित कामावर नियुक्त केल्यास त्यांना त्यांच्या शैक्षणिक कामाच्या दिवशी व वेळेस निवडणुकीचे काम दिले जाणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यात यावी" असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. या आदेशामुळे आता यापुढे निवडणुकीच्या दिवसांतही शिक्षक वर्गांत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिकवू शकतील," असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.


नक्की वाचा >> मनोहर जोशी म्हणालेले, 'राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात...'



शैक्षणिक नुकसान रोखता येण्याचा मार्ग खऱ्या अर्थाने खुला


"राज ठाकरेंच्या मनसेने त्वरित हस्तक्षेप केल्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त ताण आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखता येण्याचा मार्ग खऱ्या अर्थाने खुला झाला, याचे समाधान वाटते," असं अमित ठाकरेंनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवून या कामासाठी मनसेचे आभार मानलेत.