सचिन कसबे, झी २४ तास, पंढरपूर : एका वर्षात रक्कम दामदुप्पट होईल या आशेवर असलेल्या २८ जणांची बिटकॉईनच्या नावाखाली फसवणूक करण्यात आलीय. पंढरपुरातल्या एका डॉक्टरनेच नागरिकांची फसवणूक केलीय. त्यामुळे पंढरीत खळबळ माजलीय. राहुल शेजाळ या डॉक्टरने अनेकांना गंडा घातलाय. एका वर्षात रक्कम दुप्पट होते असं म्हटल्यावर अनेकांनी पन्नास हजारांपासून, लाखो रूपयांपर्यंत रक्कम गुंतवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टर ओळखीचा असल्याने डोळे झाकून अनेकांनी विश्वास ठेवला. महागड्या हॉटेलांमध्ये शेजाळ सेमिनार घेत असे. यामुळे सेमिनारला येणारे चांगलेच प्रभावित व्हायचे. या डॉक्टरने लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन २२ लाख ६० हजारांची फसवणूक केलीय. ही व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पंढरपूरचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलीय. 


बिटकॉईनचा एजंट म्हणून काम करत असल्याचं राहुल शेजाळने अनेकांना सांगितलं होतं. डॉ. शेजाळ विरोधात गुन्हा दाखल झालाय. 



डॉ. राहुल शेजाळने अनेक ओळखीच्या लोकांना फसवल्याचं स्पष्ट झालंय. मात्र अशा प्रकारे नागरिकांनी तरी अंधविश्वास ठेवलाच? का असाही प्रश्न निर्माण होतो. श्रीमंतीची हाव अशी अंगलट आल्यावर मग आरडाओरडा कऱण्यात काय अर्थ आहे. हे २८ जण चांगलेच फसलेत आता तुम्ही तरी फसू नका, असं आवाहन करण्यात येतंय.