नाशिक : भाजपने निवडणुकीतुन माघार घेतल्यामुळे नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष झाले आहेत तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे डॉ. सयाजी गायकवाड नवे उपाध्यक्ष झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे यंदा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे या पदासाठी चांगलीच चुरस होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने राज्यात अनेक नगरपालिका आणि स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरला जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपला याचा फटका बसत आहे. 


नाशिक जिल्हा परिषदेत एकूण ७२ सदस्यांपैकी शिवसेनेचे २५, राष्ट्रवादीचे १५, काँग्रेसचे ८ असे महाविकास आघाडीचे ४८ सदस्य आहेत. भाजपचे १५, माकपचे ३, तर ६ अपक्ष असं संख्याबळ आहे.


भाजपकडून जे. डी. हिरे यांनी अर्ज दाखल केला होता. तर उपाध्यक्षपदासाठी कान्हू गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण भाजपने माघार घेतल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.