Devendra Fadnavis on Pune Bypoll Election 2023: कसबा आणि चिंचवड (Kasbha Chinchwad By Election) मध्ये आम्ही जिंकणार आहोत असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला आहे. तसंच आम्ही जिंकणार माहिती असल्याने रडीचा डाव सुरु असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. नागपुरात (Nagpur) प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंवरही (Aditya Thackeray) टीका केली. तसंच अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करताना आपल्या लोकांना संदेश देण्यासाठी असे बोलावे लागते असा टोला त्यांनी लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपावर पैसे वाटप केल्याचा आरोपावर उत्तर देताना म्हटलं की "जेव्हा पायाखालची वाळू सरकते, तेव्हा असे आरोप होऊ लागतात. मात्र, हे आरोप भाजपावर नाही, तर मतदारांवर आहे. मतदार पैसे घेऊन मतदान करतात असं म्हणणं हा मतदारांचा अपमान आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदारांचा अपमान करण्याचा अधिकार नाही". 


"पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हारू, मात्र पैसे वाटणार नाही. मतदारच आम्हाला वारंवार जिंकवून देतात. कसबा आणि चिंचवडमध्ये आम्ही जिंकणार आहोत. यामुळे आता रडीचा डाव सुरू झालेला आहे. कसबामध्ये आचारसंहितेचं उघडपणे उल्लंघन झालं आहे," असा आरोप फडणवीसांनी केला. 


गुलाबराव पाटील यांनी मराठा चेहरा मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली असा दावा केला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले की "जे सांगायचं आहे ते मीच सांगितलं आहे. मात्र अशा गोष्टींवर रोज चर्चा करायची नसते. त्याची योग्य वेळ असते. योग्य वेळी सगळ्या गोष्टी सांगू".


फडणवीसांनी यावेळी आदित्य ठाकरेंवरही टीका केली. "काही लोकांना असं वाटते की सर्व काही त्यांच्याच काळातलं आहे. त्यांचा काळ अडीच वर्षाचा होता. अडीच वर्षात सव्वा दोन वर्ष ते दाराच्या आत होते. त्यामुळे त्यांना जे काही दोन अडीच महिने मिळाले त्यात बहुतेक त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असेल असे त्यांना वाटते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमच्या सरकारने मंत्रिमंडळात निर्णय घेतला आणि त्यानुसार छत्रपती संभाजीनगर हे नाव औरंगाबादला, तर धाराशिव हे नाव उस्मानाबादला दिलं आणि प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवले. ते केंद्राने मान्य केले. आम्ही नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. कदाचित आदित्य ठाकरे असेही म्हणू शकतात की त्यांच्या सांगण्यामुळेच मोदींनी हे प्रस्ताव मान्य केले," असा टोला फडणवीसांनी लगावला.