Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: युवासेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना मारहाण झाल्याप्रकरणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फडतूस गृहमंत्री असं म्हटलं आहे. तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं असून अडीच वर्षांचा कारभार पाहिल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असं म्हटलं आहे. तसंच मी नागपूरचा असून यापेक्षा वाईट शब्दांत उत्तर देऊ शकतो असा इशाराही दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"अडीच वर्षाचा त्यांचा कारभार पाहिल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर जे मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवत नाहीत, तसंच त्या मंत्र्यांभोवती लाळ घोटत असतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. जे वाझेच्या मागे लाळ घोटतात, ज्यांच्या काळात पोलीस वसुली करतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार? अडीत वर्ष घऱी बसून काम करणाऱ्याने आम्हाला राजकारण शिकवू नये. आमचं तोंड उघडलं तर यांना पळता भूई थोडी होईल," असा इशारा फडणवीसांनी दिला आहे. 


"लाचार, लाळघोटेपणा करणारा फडतूस गृहमंत्री", रोशनी शिंदे भेटीनंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर संतापले


"आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असं नाही. बोलू त्या दिवशी तुम्हाल पळता भुई थोडी होईल. त्यामुळे संयमाने बोला. त्यांचा थयथयाट, निराशा  याला उत्तर देण्याचं कारण नाही. मोदींचे फोटो लावून निवडून येतात आणि नंतर खुर्चीसाठी लाळघोटेपणा करता त्यामुळे खरा फडतूस कोण हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. मी नागपूरचा असून, मला त्यांच्यापेक्षा खालची भाषा येते. पण मी तसं बोलणार नाही कारण तसं बोलण्याची माझी पद्धत नाही. जनता त्यांना याचं उत्तर देईल," असं फडणवीस म्हणाले आहेत. 



पुढे ते म्हणाले की "मी पाच वर्षं राज्याचा गृहमंत्री राहिलो आहे. मी गृहमंत्री असल्याने अनेकांना अडचण होत आहे. मी गृहमंत्रीपद सोडावं यासाठी ते पाण्यात देव ठेवून बसले आहेत. पण मी हे पद सोडणार नाही. मी तुमच्या कृपेने गृहमंत्री नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये गृहमंत्री असून जो चुकीचं काम करेल त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय शांत बसणार नाही".


उद्धव ठाकरेंनी पोलीस आय़ुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केल्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की "एखादी घटना घडल्यास आमचं सरकार त्याची निष्पक्ष चौकशी करणार. त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न कोणी करु नये, ते योग्य ठरणार नाही. जे चुकीचे असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल". 


ज्यावेळी राज्यात चोर, डाकू किंवा अपप्रवृत्तीची लोक राज्याच्या विरोधात बोलतात तेव्हा राजाने योग्य काम सुरु केलं आहे असं समजावं असं चाणक्य म्हणाले होते. तेच आता खरं होत आहे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.