महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. मात्र त्याआधीच पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात जाहीरपणे निवडणूक लढू अशी कार्यकर्त्यांची अटकळ होती. मात्र अजित पवारच महायुतीत सहभागी झाले आणि हर्षवर्धन पाटलांची कोंडी झाली. त्यानंतर मग हर्षवर्धन पाटील यांनी आता तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी कमळाची साथ सोडून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची हर्षवर्धन पाटील यांची इच्छा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय लाभदायक ठरेल असा दावा हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी केला आहे. शरद पवारांनीही हर्षवर्धन पाटील यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केलं आहे.


हर्षवर्धन पाटील यांनी 2019 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्तात्रय भरणेंनी हर्षवर्धन पाटील यांना धुळ चारली. राष्ट्रवादीमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसोबत राहिले. त्यामुळे इंदापूरातून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि भाजपात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांची कोंडी झाली. त्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या पक्षात जात तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे.  


भाजपमध्ये गेल्यापासून चांगली झोप लागते. कोणतीही चौकशी नाही असं विधान हर्षवर्धन पाटील यांनी भाजपप्रवेशावेळी केलं होतं. आता मात्र झोप लागण्याच्या प्रश्नावर उत्तर देणं हर्षवर्धन पाटील यांनी उत्तर देणं टाळलं. तुम्ही मागे बोलला होतात की भाजपमध्ये गेल्यामुळे शांत झोप लागते? असा प्रश्न विचारला असता त्यांनी नो कमेंट्स म्हणत भाष्य करणं टाळलं. विधानपरिषदेचा प्रस्ताव होता का? या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं नाही. 


दुसरीकडे हर्षवर्धन पाटील पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्यानं पक्षातील निष्ठावान नेते नाराज झाल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन पाटील यांना त्यामुळे दुहेरी सामना करावा लागणार आहेत. जर हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून शरद पवार गटाकडून तिकीट मिळालं तर त्यांच्यासमोर अजित पवारांच्या दत्तात्रय भरणे यांचं आव्हान असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची नाराजीही दूर करावी लागणार आहे. त्यामुळे तुतारी फुंकण्याचा निर्णय घेणा-या हर्षवर्धन पाटील यांचीच झोप उडणार की मग हर्षवर्धन पाटील आपल्या विरोधकांची झोप उडवणार हे येणा-या काळात स्पष्ट होईल.