सातारा : गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपलं शेवटचं बजेट आज सादर करत आहेत. माथी भडकवून जातीपातीचं राजकारण करण्याचा उद्योग महाराष्ट्रात सुरु आहे.  खोटं बोलण्यात भाजप सरकार पटाइत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यात मनसेच्या पदाधिकारी मेळावा होत आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा साताऱ्यात पहिल्यांदाच होत असून ते लोकांशी संवाद साधणार आहे. त्याआधी त्यांनी भाजप आणि मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.


मोदींचे शेवटचे बजेट, CM खत्रीचे एजंट


नरेंद्र मोदी म्हणजे नमो रुग्ण. केंद्र आणि राज्यात फसवणूक सुरु आहे आहे. नरेंद्र मोदी यांचे हे शेवटचं बजेट आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस दररोज आकडेमोड करत आहेत. हे मुख्यमंत्री आहेत की रतन खत्रीचा मटका चालणारे एजंट, अशी टीका केली.


भाजप सरकारचा पराभव अटळ


देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती आणणाऱ्या मोदी सरकारचा खिसा पूर्णपणे फाटका बनलाय, मात्र त्यांच्या बाता हजारो कोटींच्या भाषेत सुरू झाल्यात. जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपले असून येत्या निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव अटळ आहे, असा ठाम विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.


देशाला वेड्यात काढण्याचे काम


ऊठ सूठ गुजरातच्या खोट्या प्रतीमेचा उदोउदो करून संपूर्ण देशाला वेड्यात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. परदेशातील कोणतीही प्रमुख व्यक्ती देशात आली तर तिला केवळ गुजरातमध्येच नेले जाते. का? आमचा महाराष्ट्र नाही का? केरळ, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश अन् मध्य प्रदेशसारख्या राज्यात विकास झाला नाही का? असा सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला. 


जातीय दंगलीचा गौप्यस्फोट


२०१५ मध्येच मी गौप्यस्फोट केला होता. पुढच्या काही वर्षांत सतत जातीय दंगली घडविल्या जातील. माझ्या त्या वेळच्या बोलण्याची सत्यता आता लोकांना कळू लागली आहे, असेही राज म्हणालेत.