सातारा : भाजप नेते दीपक पवार हे भाजपला रामराम ठोकत येत्या २२ तारखेला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात दीपक पवार राष्ट्रवादीतून निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार आणि सातारा जिल्ह्यातील काही आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दीपक पवार यांना राष्ट्रवादीत घेऊन शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता दीपक पवार यांच्या रूपाने एक तगडे आव्हान शिवेंद्रराजे भोसले यांच्यासमोर उभे राहणार आहेत. 


साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवेंद्रराजे भोसलेंनी भाजपात प्रवेश केला. मात्र गेल्यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे दीपक पवार यांनी शिवेंद्रराजेंविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे.  भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी साताऱ्यात मेळावा घेतला. या मेळाव्यात शिवेंद्रराजे हटावचा नारा देण्यात आला. तसा ठराव पारित करण्याचा निर्णय केला. मात्र, भाजपने शिवेंद्रराजे यांना पक्ष प्रवेश देऊन त्यांची साताऱ्यातून भाजपाची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यामुळे दीपक पवार नाराज होते. त्यामुळे त्यांनी शिवेंद्रराजेंविरोधात जमवाजमव सुरू केली आहे. भाजपने लक्ष न दिल्याने नाराज झालेले दीपक पवार राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार आहेत.