नाकाला ऑक्सिजनची नळी, बोटाला ऑक्सिमीटर आणि व्हिलचेअर... गिरीश बापट कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचारात
कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत आहे. या प्रचारासाठी भाजपने गिरीश बापट यांना प्रचारात उतरवण्यात आलं आहे.
Kasaba By Election : प्रकृती अस्वस्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून दूर असलेले भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते गिरीश बापट (Girish Bapat) हे अखेर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरलेत. केसरी वाड्यातल्या भाजपच्या (BJP) मेळाव्यात गिरीश बापट उपस्थित राहिलेत. दोन दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण देत कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasaba By Election) प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचे सांगितलं होतं.
मात्र, कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीत (BJP vs Mahavikas Aghadi) अटीतटीची लढाई सुरु असल्याने गिरीश बापट आजारपण बाजुला सारून आपल्या पक्षासाठी प्रचाराच्या मैदानात उतरलेत. नाकात ऑक्सिजनची नळी आणि बोटाला ऑक्सिमीटर लावून व्हिलचेअरवरुन गिरीश बापट कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काल गिरीश बापटांची भेट घेऊन विचारपूस केली होती. तसंच फडणवीसांनी काल पुण्यात बैठकत घेऊन कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या.
काय म्हटलं होतं गिरीश बापट यांनी
गिरीश बापट यांनी एक पत्रक दिलं होतं, त्यात त्यांनी आपल्या तब्येतीबद्दल माहिती दिली होती. गेल्या 3 महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्याला काम करता आलेलं नाही. आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे सध्या डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. परिणामी मी कसबा पोटनिवडणुकीसाठी घरोघरी जाऊन प्रचार करु शकत नाही, असं गिरीश बापट यांनी या पत्रकात म्हटलं होतं.
गिरीश बापट यांच्या जिवाशी खेळ - काँग्रेस
पुण्याचे खासदार गिरीष बापट यांना आजारपणात प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलाय... बापट नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर पुणे भाजपने खा. गिरीष बापट यांना प्रचारात उतवण्याचं ठरवलंय... त्यावरून कांग्रेसचे मोहन जोशी आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर जोरदार संधान साधलंय. दरम्यान आजारपणामुळे मी प्रचारात सहभागी होणार नाही असं निवेदन गिरिष बापट यांनी नुकतंच काढलं होतं. मात्र काल भाजपाचे पाच मंत्री आणि नेते यांच्या ६ तास चाललेल्या बैठकीनंतर बापट प्रचारात ग्राऊंडवर उतरले.