Gopichand Padalkar on Ajit Pawar: भाजप नेते गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी आणि विशेषत: पवारांचे कट्टर विरोधक मानले जातात. पडळकर आपल्या बारामती दौऱ्यात पवार कुटुंबियांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिंदे-फडणवीसांच्या डबल इंजिन सरकारमध्ये आता अजित पवारांचे इंजिन जोडले गेले आहे. अजित पवारांनी सत्ताधारी भाजपला साथ दिली आहे. दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जोरात काम सुरू आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना मोदींवर विश्वास आहे. मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, हे विरोधकांनाही पटलंय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शपथ घेतल्याचे पडळकर म्हणाले.  


राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पीएम मोदींसोबत राहण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो, असेही ते पुढे म्हणाले.


दरवेळेस बारामतीत आल्यावर गोपीचंद पडळकर पवार परिवारावर टीका करत असतात. पण आज मात्र त्यांनी शांत राहणे पसंत केलं. यावर त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. 


'आज पवारांना डबल डोस द्यायला नको. त्यांची काय परिस्थिती आहे ते बघू. वेळ काळ बघून बोलणं गरजेचं आहे. परत आल्यावर नेमकं काय चित्र आहे हे स्पष्ट होईल, तेव्हा बघू', असे पडळकर म्हणाले. 


अजित पवारांनी भाकरी फिरवली


राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज धक्कातंत्राचा वापर करत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची (DYCM of Maharastra) शपथ घेतली. अजित पवार आता शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम,संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी थेट भाकरी फिरवल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे.