कोकणात राजकीय शिमगा पेटला, पोलिसांचा विरोध झुगारुन किरीट सोमय्यांची दापोलीकडे कूच
कोणाच्या बापाला घाबरलो नाही, जेवढे अडवला, तेवढे अजून आडवे जाऊ, निलेश राणे यांचा इशारा
दापोली : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोलीतील रिसॉर्टकडे निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पोलिसांनी कशेडी घाट उतरल्यावर अडवलं. पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी सोमय्यांना नोटीस देऊ केली. आंदोलनामुळे दापोलीतील स्थनिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत होतोय.
तसंच सणांमुळे अद्याप जमावबंदी लागू आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तुम्हाला जबाबदार धरलं जाईल, असं पोलिसांनी या नोटिशीत म्हटलंय. त्यानंतर सोमय्यांनी पोलिसांसोबत जोरात वाद घालत नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. आपण आदेश घेऊन आलोय, असं सांगत त्यांनी पोलिसांसमोर कागदही नाचवला. यावेळी जोरदार वादावादी झाली.
30 तारखेला अनिल परब यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. सगळेच विचारत आहेत की पुढचा नंबर कोणाचा यावर बोलताना सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांनीच आता चिठठ्या काढाव्यात असं म्हटलं आहे. त्यांची आता पंचाईत झाली आहे, जर यात तेजस आणि आदित्य ठाकरे यांचं नाव निघालं तर बापानेच मुलाची चिठ्ठी काढण्यासारखं होईल असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे.
रिसॉर्टवर कारवाई केल्यास बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होणार आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे, हा पोलीस अधिकारी कोणाला चॅलेंज देतोय, असा प्रश्न सोमय्यांनी विचारला.
'म्हणून अनिल परब यांची मान गायब झाली'
दरम्यान, रत्नागिरीतील भरणा नाक्यावर किरीट सोमय्या यांना माजी खासदार निलेश राणेही भेटले. यावेळी निलेश राणेंनीही अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. पोलिसांचा विरोध डावलून सोमय्यांनी दापोलीकडे कूच केली आहे. तर शिवसेनेनं त्याच्या या दौऱ्याला विरोध केलाय.
पैसे खाऊन खाऊन अनिल परब यांची मान गायब झाली आहे, त्यांनी तो रिसॉर्ट उभा कसा केला, तो पाडणार कधी, हे विचारण्याचं काम आम्ही करु शकत नाही तर काय महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का? असा सवाल निलेश राणे यांनी विचारला आहे. पण आम्ही हे विचारणार आम्ही कधी कोणाच्या बापाला घाबरलो नाही, जेवढे अडवला, तेवढे अजून आडवे जाऊ, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे . आणि किरीट सोमय्या ज्यांच्या मागे लागतात त्यांची कुंडली बदलली असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला आहे.