भाजप नेते नारायण राणे कोरोना पॉझिटीव्ह
नारायण राणे यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलाय. ट्वीटरवरुन त्यांनी ही माहिती दिली. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार असल्याचे राणे म्हणाले.
गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन राणेंनी केलंय. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल असेही ते म्हणाले.
कोरोना रुग्णांची संख्या वाढली
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज कोरोना रुग्णांची संख्या ६२ लाखांवर पोहोचली असून गेल्या २४ तासांमध्ये ८० हजार ४७२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार १७९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. देशात ६२ लाख २५ हजार ७६४ जण कोरोना बाधित झाले आहेत. देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असताना देखील दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील कोरोना या धोकादायक विषाणूवर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
सध्या देशात ९ लाख ४० हजार ४९७ रुग्ण उपचार घेत आहेत . त्याचप्रमाणे ५१ लाख ८७ हजार ८२६ रुग्णांनी या धोकादायक विषाणूवर मात केली आहे. आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसमुळे ९७ हजार ४९७ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात आतापर्यंत ७,४१,९६,७२९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर मंगळवारी १० लाख ८६ हजार ६८८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे देशात येत्या १ ऑक्टोबरपासून अनलॉक ५ची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.