Maharashtra Politics : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची पक्षावरची नाराजी हा कायम चर्चेचा विषय असतो. पंकजांनी उघडपणे आजवर नाराजी कधीच बोलून दाखवलेली नाही मात्र त्यांच्या विधानांमधून किंवा कृतीतून त्यांची खदखद व्यक्त होते. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासमोरच पंकजा मुंडे यांनी आपली घुसमट बोलून दाखवलीय. करण-अर्जुन (Karna-Arjun) युद्धाचा दाखला देत यापुढे बाहेरच्यांनी बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करु नये असा इशाराच दिला. विशेष म्हणजे पंधरा दिवसात दोन वेळा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) बीड दौऱ्यावर होते, त्यानंतर पंकजांचं हे विधान आल्यानं चर्चांना उधाण आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार  (Shinde-Fadanvis Government) स्थापन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं मंत्रिमंडळात पुनर्वसन होईल अशी चर्चा होती. पण पंकजांना कुठेच स्थान मिळालं नाही, त्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा नाराज असल्याचं बोललं जातंय. 15 दिवसात देवेंद्र फडणवीसांनी दोन वेळा बीडचा दौरा केला. मात्र पंकजा मुंडे दोन्ही कार्यक्रमात दिसल्या नाहीत. 


फडणवीस जिथे असतात तिथे तुम्ही जाणं टाळता का असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी उत्तर देताना देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले होते, त्या कार्यक्रमाला मी अपेक्षित नव्हते, म्हणून मी तिथे आले नाही, मी भाजपाच्या संस्कारात वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे, त्यामुळे पक्षाचा आणि संघटनेचा प्रोटोकॉल मी पाळते, पण पक्षाबाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला बंधनकारक नाही, असं त्या म्हणाल्या. 



काही आठवड्यांपूर्वी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (BJP President J P Nadda) मराठवाडा दौऱ्यावर होते. पण त्यांच्या कार्यक्रमाचं पंकजा मुंडेंना निमंत्रणच नव्हतं. फडणवीस दोनदा पंकजांचं होमग्राऊंड असणाऱ्या बीड जिल्ह्यात येऊन गेले पण पंकजा फडणवीसांच्या कार्यक्रमात फिरकल्या नाहीत. आता तर बीड जिल्ह्यात बाहेरच्यांनी हस्तक्षेप करु नये असं पंकजांनी थेट बोलून दाखवलंय. त्यामुळे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी त्यांची अवस्था झाल्याची चर्चा सुरु झालीय.