धक्कादायक! मराठी असल्याने पंकजा मुंडेंनाही मुंबईत घर नाकारलं; Video मध्ये म्हणाल्या, `मी कोणत्याही...`
Pankaja Munde Says Denied Home For Being Marathi: मुंबईतील मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला केवळ ती मराठी असल्याने सोसायटीने नकार दिल्याच्या मुद्द्यानंतर पंकजा मुंडेंनीही एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Pankaja Munde Says Denied Home For Being Marathi: मुंबईतील मुलुंडमध्ये मराठी महिलेला ऑफिससाठीची जागा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार चर्चेत असतानाच भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि माजी आमदार पंकजा मुंडे यांनी आपल्यालाही केवळ मराठी असल्याने घर नाकारण्यात आल्याचा दावा केला आहे. पंकजा मुंडेंनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये हा खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी मुलुंडमधील प्रकाराचा संदर्भ देत आपल्यासारख्या व्यक्तीलाही हा अनुभव आल्याचं म्हणताना हे फार दुर्देवी असल्याचंही म्हटलं आहे.
समाजामध्ये अस्वस्थता
गणपती विसर्जनाच्या दिवशी पंकजा मुंडेंनी इन्स्टाग्रावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये समाजात फारच अस्वस्थता असल्याचा मुद्दा सुरुवातीला मांडला आहे. "नमस्कार, माफ करा माझी थोडी प्रकृती खराब आहे. त्यामुळे बोलायला थोडा त्रास होत आहे. त्याचबरोबर थोडी मनस्थिती सुद्धा खराब आहे. आताचं राजकारणातलं वातावरण. एकंदरित सामाजातील वातावरण. इतकं सारं काही सुरु असताना, इतकी सगळी समृद्धी असताना रस्ते आहेत, हायवे आहेत. लोकांना सगळ्या सुविधा आहेत. प्रत्येकाकडे गाड्या आहेत. साधनं आहेत. हे सगळं असताना कुठेतरी अस्वस्थता आहे समाजामध्ये," असं पंकजा व्हिडीओच्या सुरुवातीला म्हणतात.
आरक्षणाची भांडणं
पुढे बोलताना पंकजा मुंडेंनी, "आरक्षणाची भांडणं सुरु आहेत. वेगवेगळ्या समाजाची लोकं, कोणी मुंडन करतंय, कोणी काय करतंय. कोणी आंदोलन करतंय. हे बघून हृदयाला पीळ पडतो. त्याचबरोबर प्रत्येक रंगामध्ये माणूस वाटला गेला आहे. हिरवा आहे. भगवा आहे. पिवळा आहे. निळा आहे. हे सगळं बघू कधीकधी वाटतं की हे सगळे रंग जोरजोरात फिरवले ना एका चक्रावर बसून तर त्यातून एक पांढरा रंग येतो. तो शांततेचा रंग आहे. हा रंग कधी आपल्या देशाला व्याप्त करेल याची मी प्रतिक्षा करतेय," असंही म्हटलं आहे.
नक्की वाचा >> सदावर्तेंचं वादग्रस्त विधान! म्हणाले, 'शरद पवारांचे विचार नथुरामच्या पायाची धूळही नाहीत, गांधींचा विचारही...'
मराठी असल्याने मलाही घर नाकारलं
मराठी मुलीला घर नाकारण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन पंकजा यांनी आपल्यालाही असा अनुभव आल्याचं म्हटलं आहे. "आज एका मराठी मुलीची व्यथा मी पाहिली. खरं तर भाषा आणि प्रांतवादामध्ये पडायला मला आवडत नाही. माझ्या संपूर्ण राजकीय प्रवासात मी कधीही जातीवाद, प्रांतवाद, धर्मवाद यावर टीप्पणी केलेली नाही. कोणी कोणत्या भाषेत बोलावं. कोणी कोणत्या भाषेत त्यांच्या घरांची, दुकानांची नावं ठेवावीत यावर मी फार कधी उडी घेतलेली नाही. पण एक मराठी मुलगी जेव्हा रडून सांगत होती की इथे मराठी माणसाला घर देत नाहीत. इथे मराठी माणसाला प्रवेश दिला जात नाही. हे म्हणत असताना तिच्याबरोबर जो प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणार आहे कारण जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी लोकांना आम्ही इथे घर देत नाही," असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
मुंबईत सगळ्याचं स्वागत आहे पण...
मराठी असल्याच्या मुद्द्यावरुन घर नाकारलं जाण्यासंदर्भात बोलताना पंकजा मुंडेंनी, "मी कोणत्याही एका भाषेची किंवा गोष्टीची बाजू घेत नाही कारण मुंबईच सौंदर्य हे प्रत्येक भाषेने, प्रत्येक जातीने आणि प्रत्येक धर्माने नटलेलं आहे. ही राजकीय नसून आपल्या देशाची आर्थिक राजधानी असल्याने इथं सर्वांचं स्वागतच आहे. पण आम्ही यांना घर देत नाही असं काही इमारतींमध्ये बोलत असतील तर हे फार दुर्देवी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला हे फार दुर्देवी आहे. या देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये दुसऱ्या राज्यातील लोकांना, कोणत्याही जातीच्या लोकांना घर देण्यासाठी परवानगीची आवश्यकता काय? हा माझा प्रश्न आहे," असं म्हटलं आहे.
व्हिडीओच्या शेवटी केलं आवाहन
व्हिडीओच्या शेवटी पंकजा मुंडेंंनी, "आज गणपती विसर्जन आहे. आपण गणपतीची विसर्जन नाही करायचं आज गणेशाचा आशिर्वाद ठेऊन सर्व नकारात्मक गोष्टींचं विसर्जन करायचं. सगळ्या आतंकाचं. जाती, धर्म, भाषा, प्रांतासंदर्भातील सर्व वादांचं विसर्जन करायचं असं नाही का ठरवू शकतं? बघा कसं वाटतं तुम्हाला. माझी ही भूमिका परत परत ऐका ही कोणा एकासाठी नाही पण ही भूमिका सर्वांनी एक व्हावं यासाठी आहे," असं आवाहन केलं आहे.