Gunaratna Sadavarte On Sharad Pawar: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्तेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त शब्दांमध्ये टीका केली आहे. महात्मा गांधींच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या नथुराम गोडसेचं समर्थनही सदावर्तेंनी केलं आहे. यवतमाळमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नथूराम गोडसेचा उल्लेख करत गुणरत्न सदावर्तेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. पवारांचे विचार हे नथूराम गोडसेच्या पायाच्या धुळी इतकेही नाही. गांधीजींचे विचार आता शिल्लक राहिलेले नाहीत, असं वादग्रस्त विधान गुणरत्न सदावर्तेंनी केलं आहे.
गुणरत्न सदावर्तेंनी आपल्या भाषणामध्ये नथूराम गोडसेचा आदयुक्त उल्लेख केला. नथुराम गोडसेच्या विचारातील अखंड भारताचा विचार आजही भारतीयांच्या मनात असल्याचं विधानही सदावर्तेंनी केलं आहे. महात्मा गांधींचे विचार म्हणून जे सांगितले जातात ते विचार आता शिल्लक नाहीत असं आपलं वैयक्तिक मत असल्याचंही सदावर्तेंनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसवरही निशाणा साधताना सदावर्ते यांनी काँग्रेस कधीच नथुरामच्या विचारांना संपवू शकत नाही असंही म्हटलं आहे.
"नथुरामजींची अखंड भारताची भूमिका प्रत्येक हिंदुस्तानी काळजामध्ये ठेऊन आहे. कुणाला सुद्धा भारताचे तुकडे पसंत नाहीत. आज सुद्धा तोच विचार आहे. गांधींचा विचार आता काही शिल्लक राहिलेला नाही असं मला वाटतं. अखंड भारताचाच विचार शिल्लक आहे. पाकिस्तान देण्याचा विचार शिल्लक नाहीय. म्हणून त्यांचा (नथूरामचा) विचार काँग्रेसी कधीही संपवू शकत नाहीत. असे थातूर मातूर फुटक्या विचारांचे तर कधीच संपवू शकत नाहीत. त्यांची लायकीच नाही. शरद पवारांचा विचार सुद्धा नथुरामजींच्या पायाच्या धुळीइतका सुद्धा नाही असं माझं स्पष्ट मत आहे," असं वादग्रस्त विधान सदावर्तेंनी केलं आहे.
सदावर्तेंनी केलेल्या या विधानावर शरद पवार गटाचे नेते आणि प्रवक्ते महेश तपासे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "सदावर्ते हे कोणत्या विचारांवर काम करतात हे जगासमोर येऊ लागलेलं आहे. त्याला बहुजनवादी म्हणायचं, धर्मनिरपेक्ष म्हणायचं. नको त्या विचारांचा पुरस्कार करायचा हे नव्यानेच पाहायला मिळतंय. मी देखील काल कुठल्यातरी वृत्तवाहिनीवर पाहिला. मला देखील धक्काच बसला," असं म्हटलं आहे.
"अशा पद्धतीची विधानं करुन समाजामध्ये द्वेष कसा निर्माण करायचा याचं ट्रेनिंग भारतीय जनता पार्टीने व्यवस्थितपणे सदावर्तेला दिलेलं दिसत आहे," असंही तापसे यांनी म्हटलं आहे. यापूर्वीही गुणरत्न सदावर्तेंनी अनेकदा शरद पवारांबरोबरच अनेक नेत्यांबद्दल अशाप्रकारची वादग्रस्त विधानं केली आहेत.