नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या काटोल व नरखेड तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम तोकडी असून वाढीव मदत जाहीर करावी यासाठी १४ फेब्रुवारी पासून काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख ठिय्या आंदोलनावर बसले आहेत. तसेच त्यांनी भाजपवर अनेक आरोप केले आहेत. 


यशवंत सिन्हा यांचाही पाठिंबा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिष देशमुखांच्या या ठिय्या आंदोलनाला भाजपचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा आज भेट दिली. भाजप नेतृत्वाविरोधात नेहमीच आवाज उठवणारे यशवंत सिन्हा यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या लावून धरत गेल्या डिसेंबर महिन्यात अकोल्यातही ठिय्या आंदोलन केलं होतं.


... म्हणून बॅंकेचे प्रकरण उकरून काढले


साडेअकरा हजार कोटी रुपये घेऊन पळालेल्या नीरव मोदीवर कोणतीही कारवाई होत नाही. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन सुरू केल्याबरोबर माझ्या वडीलांच्या विरोधातील बॅंकेचे प्रकरण उकरून काढले आहे, असे सांगत भाजपात येऊन आपण चूक केल्याची कबुली भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी दिली. 


काय आहे प्रकरण?


माजी मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्या मालमत्तेवर आयडीबीआय बॅंकेने जप्तीची कारवाई केली आहे. रणजित देशमुख हे आशिष देशमुख यांचे वडील आहेत. रणजित देशमुख यांनी आयडीबीआय बॅंकेकडून घेतलेल्या ५ कोटी ७० लाख रुपयांच्या कर्ज थकबाकीप्रकरणी बॅंकेने त्यांच्या आमदार निवासजवळ असलेल्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे. ही कारवाई सुडबुद्धीने केल्याचा आरोप त्यांनी केला. 


मुख्यमंत्र्यांवर टीका


यावेळी बोलताना आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. लोकांचा मुख्यमंत्र्यांवर कोणताही विश्‍वास राहिला नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन खुर्ची खाली करावी, असे ते म्हणाले. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतेही निर्णय घेतले नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या सरकारकडून कोणतीही अपेक्षा राहिलेली नसल्याचा आमदार देशमुख यांनी सांगितले.