Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी जामीन अर्जासाठी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. पण आज त्यांनी हा अर्ज मागे घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग तपास अधिकाऱ्यांकडे शरणागती पत्करली. त्यानंतर ते कणकवली दिवाणी न्यायालयात दाखल झाले. चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार असल्याचं नितेश राणे यांचे वकील अॅड. सतिश मानेशिंदे यांनी म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं नितेश राणेंना अटकेपासून 10 दिवसांचं संरक्षण दिलं आहे.


न्यायालयाच्या निर्णयाचा आदर
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं, आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने राज्य सरकारने मला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण मी आज स्वत:हून न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात असल्याची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.


काय आहे प्रकरण?  
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीदरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला जीवघेणा हल्ला झाला होता. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी आपल्यावर शस्त्राने हल्ला केल्याचा दावा संतोष परब यांनी केला आहे. या हल्लामागे भाजप आमदार नितेश राणे असल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता. संतोष परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आहेत.