प्रताप नाईक, झी मीडिया कोल्हापूर : सिंधुदुर्गमधील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर सिंधुदुर्गमधील राजकारण शिगेला पोहचलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख असलेल्या संतोष परब यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्यावर हल्लाचा आरोप केला आहे. या हल्ल्याचा घटनाक्रम त्यांनी झी 24 तासकडे सांगितला आहे.


त्या दिवशी नेमकं काय घडलं?
रात्री साधारण अकरा वाजता आपण नरडवा दिठा इथं मुलाची वाट पाहत उभे होतो, माझा मुलगा आंबोलीवरुन येणार होता, 


आंबोलीवरुन आलेल्या माझ्या मुलाची बॅग मोठी असल्याने त्याला रिक्षात बसवलं आणि रिक्षाच्या मागून आपण दुचाकीवरुन जात होतो. त्याचवेळी वेगाने आलेल्या एका गाडीने आपल्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की आपण दुचाकीवरुन 10 ते 15 फूट लांब उडालो. 


ही इनोव्हा गाडी होती आणि त्याला नंबर प्लेट नव्हती, त्या गाडीतून उतरलेल्या व्यक्तीने जवळ येत धमकी दिली. तू सतीश सावंतचं काम करतोस ना, बघतोच तुला असं सांगत त्या व्यक्तीने खिशातून धारदार शस्त्र काढलं आणि ते त्याने आपल्या मानेवर मारण्याचा प्रयत्न केला.


मानेवरचा वार चुकला पण छातीवर त्याने दोन वार केले. यानंतर त्याने गोट्या सावंत आणि नितेश राणे यांना ही गोष्ट कळवायला हवी असं सांगत खिशातला मोबाईल काढून कुणाशी तरी बोलला. त्यानंतर तो इनोव्हा गाडीत बसून निघून गेला. 



त्या व्यक्तीने घेतलेल्या नावांवरुन आपण पोलीस स्थानकात तक्रार दिली. गेल्या विधानसभेपासून नितेश राणे आणि गोट्या सावंत माझ्या आणि सतिश सावंत यांच्या विरोधात आहेत. आमच्या विरोधात त्यांची षडयंत्र सुरुच आहेत.


कालपर्यंत ते बोलत होते की आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, मला यात गोवण्यात येत आहे, मग पोलीस तपासाला योग्य सहकार्य करुन तपासणीला जायला हवं, घाबरण्याची गरज नाही. ज्या अर्थी हे अटकपूर्व जामीन मागतायत, त्या अर्थी हेच सूत्रधार आहेत. 


हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला लवकरच अटक होईल आणि मला न्याय मिळेल. 


सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने हा हल्ला झाला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी दहशत निर्माण करायची ही राणे स्टाईल आहे. हा हल्ला सुद्धा असाच केलेला आहे. 


पण कितीही दहशत पसरवली तरी सर्व जागा या महाविकास आघाडीच्याच येतील, असा विश्वास संतोष परब यांनी व्यक्त केला आहे.