मुंबई : संजय काकडे भाजपाला सोडचिठ्ठी देणार का ? अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. त्यांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण आता या प्रकरणावरचा पडदा उघडला गेला आहे. मी कॉंग्रेसमध्ये जाणारच अशी ठाम भूमिका संजय काकडे यांनी घेतली आहे. झी 24 तासशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. संजय काकडे विद्यमान राज्यसभा खासदार आहेत. भाजपामध्ये नवंजुनं असं काही सुरू आहे, त्याला कंटाळून कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या कॉंग्रेसमध्ये जाण्याने भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. पण कॉंग्रेस त्यांना भाजपा विरोधी उमेदवारी देणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझे आणि मुख्यमंत्र्यांशी 2014 पासून मैत्रीचे संबंध आहेत. आम्ही गेले 5 वर्षे मित्र आणि भावाच्या नात्याने काम करत आहोत. मी माझा निर्णय सांगण्यासाठी वेळ घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलो. मैत्रीच्या नात्याने त्यांनी मला अडवण्याचा प्रयत्न केला. पण माझा कॉंग्रेस प्रवेश निश्चित असल्यावर मी ठाम होतो. मी कॉंग्रेसच्या वरीष्ठांना भेटून आलो आहे. कॉंग्रेसचे पक्षश्रेष्ठी आदेश देतील तेव्हा मी प्रवेश करेन. भाजपा मधून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होतो. मी लोकसभेच्या मतदार संघात चांगले काम केले होते. माझे इथले काम सर्वांनाच माहीत आहे. जर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदेश देतील तेव्हा मी निवडणूक लढवेन. कॉंग्रेस पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल असेही ते म्हणाले. 


 मुंबईतील वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि काकडे यांच्यात चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय काकडे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना अपयश आले. खासदार संजय काकडे भाजपामध्येच राहतील, काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय काकडे यांनी बदलल्याची माहिती भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होते. पण काकडे भाजपामध्ये राहणार असले तरी पुणे लोकसभा मतदारसंघातून काकडेंना भाजपाची उमेदवारी मिळणार नसल्याचेही चित्र स्पष्ट होते. मात्र काकडेंचा पक्षात सन्मान राखला जाण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही भाजपाच्या गोटातून कळत होते. त्यामुळे काकडें बाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. काकडेंचे व्याही सुभाष देशमुख हे काकडेंना घेऊन वर्षावर गेले होते. यावेळी काकडेंसाठी देशमुखांनी मुख्यमंत्री दरबारी वजन वापरल्याची चर्चा होती. पण या भेटीत मनजुळणी झाली नाही.