पत्राचाळीतील लोकांना न्याय मिळणार, नितेश राणेंची राऊतांवर जळजळीत टीका
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी ईडीची टीम दाखल झाली आहे.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी ईडीची टीम दाखल झाली आहे. पत्राचाळ प्रकरणात त्यांची ही चौकशी सुरु असल्याची माहीची मिळत आहे. ईडीच्या या कारवाईवर आता भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
भ्रष्टाचाराची किंमत चुकवावी लागेल
रोज सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाल्याचं समाधान आहे. पत्राचाळीतील लोकांना आता न्याय मिळेल असं वाटत असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच झुकेगा नहीं वगेरे म्हणणाऱ्यांना आता कळेल. भ्रष्टाचार, महिला अत्याचार करायचा आणि आपल्याला काहीच होणार नाही असं त्यांना वाटायचं. मात्र आता त्यांना कळेल. पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केलेली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात शिक्षा व्हायलाच हवी. भ्रष्टाचाराची किंमत चुकवावी लागेल तर तुम्ही कुणीही असलात तरी चौकशी होणारच, असं राणे म्हणाले.
याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केलीये. शिवसेना नेते संजय राऊत यांची जागा नवाब मलिक यांच्या शेजारीच असावी अशी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची इच्छा असल्याचं किरीट सोमय्या म्हणालेत. राऊत हे परदेशात कुटुंबासह फिरायला जात होते. त्यासाठी पैसा आला कुठून? असा सवाल करत याचा हिशोब द्यावा लागणार असल्याचं सोमय्या म्हणलेत.
सोमय्या पुढे म्हणाले, पत्राचाळ प्रकरणी मीच मीडियाला पुरावे दिलेत. जिथे तक्रारी केल्या, त्यांनाही पुरावे दिले. राऊतांच्या विदेशवाऱ्या व्हायच्या, कुटुंबासह परदेशात जायचे. विमानाचे तिकीट, हॉटेलची बिलं कोण देत होतं? प्रवीण राऊत आणि बाकीच्यांचे संबंध कशा प्रकारे आहेत? हिशोब तर द्यावेच लागतात आणि माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.
दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीये. ते म्हणाले, "राऊतांनी तपास यंत्रणांना काम करू द्यावं. ज्याला कर नाही, त्याला डर नाही. राऊत पत्रावाला चाळीची माहिती ईडीला देतील याचा विश्वास आहे. अनेक लोक आहेत जे राजकारणात नाही, त्यांचीही चौकशी झालीये. मुख्य म्हणजे तपास यंत्रणांकडे काही माहिती असते तेव्हा ते अशा पद्धतीने कारवाई करतात."
काय आहे पत्रा चाळ प्रकरण?
गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी गुरूआशिष कन्स्ट्रक्शनचा म्हाडासोबत करार
पत्राचाळीच्या ठिकाणी 3 हजारांहून अधिक फ्लॅट बांधायचे होते
एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते
उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरूआशिषकडे राहणार होते
बांधकाम न करता गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसणूक
गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने ही जमीन 1 हजार 34 कोटींना दुसऱ्या बिल्डरला विकली