अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवजयंतीबाबत अपशब्द वापरणाऱ्या, भाजपचे बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम यांना 15 दिवसांसाठी हद्दपार करण्यात आलं आहे. अहमदनगरच्या प्रांताधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत. श्रीपाद छिंदम यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर महिनाभर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी त्यांची जामिनावर सुटका झाली. सुटकेनंतर प्रसाद छिंदम नगरमध्येच थांबले होते. मात्र दोन दिवसांपासून छिंदम यांना तडीपार करण्याची मागणी करत काही संघटनांनी त्याविरोधात मोर्चा काढण्याची तयारी सुरु केली होती. 


याआधीही छिंदम यांचे प्रताप, पण तडीपारीला आता मंजुरी


याआधी काही प्रकरणात प्रसाद छिंदम यांना तडीपार करण्याचा प्रस्ताव स्थानिक पोलिसांनी तयार केला होता. मात्र त्याला अदयाप प्रांताधिकाऱ्यांनी मंजुरी दिली नव्हती. आता अहमदनगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ठिक राहावी, तसंच शांतता कायम टिकून राहावी यासाठी प्रसाद छिंदम यांना पंधरा दिवसासाठी हद्दपार करण्यात आलं आहे.